केली शॅकची तोडफोड; कर्मचाऱ्यालाही मारहाण

म्हापसा: उत्तर गोव्यातील बागा समुद्रकिनाऱ्यावर मद्यधुंद पर्यटकांनी मोठा राडा केल्याची घटना समोर आली आहे. बागा येथील 'गुड लक' शॅकमध्ये वीजपुरवठा खंडित होणे आणि जेवणाच्या बिलावरून बेळगाव (कर्नाटक) येथील पर्यटकांच्या गटाने मोठा वाद घातला. या पर्यटकांनी टेबलवर बिअरची रिकामी बाटली फोडून वेटरच्या कानशिलात लगावली. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी दयानंद करजागी (२३, रा. बेळगाव) याला प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक केली आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री घडली. संबंधित शॅकमध्ये चार पर्यटकांचा गट जेवणासाठी गेला असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे संतापलेल्या पर्यटकांनी वेटरला जाब विचारला, ज्याचे रुपांतर शॅक कर्मचारी आणि पर्यटकांच्या वादात झाले.
काही वेळाने वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर जेवणाच्या बिलावरून या गटाने पुन्हा वाद उकरून काढला. यावेळी संशयिताने शॅकच्या एका वेटरला मारहाण केली आणि बिअरची रिकामी बाटली टेबलावर फोडली.
त्यानंतर बिलाचे पैसे देण्यासाठी काउंटरवर गेल्यानंतर या पर्यटकांनी शॅकचे मालक जॉन लोबो यांच्याशी हुज्जत घातली. आपण नौदलाचे (नेव्ही) जवान असल्याचे सांगत त्यांनी शॅक बंद पाडण्याची धमकी दिली. शॅक मालक लोबो यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारपैकी एका संशयिताला 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' (BNSS) कलम १७० अन्वये अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
एवढेच नव्हे तर त्यांनी शॅक बंद पाडण्याची धमकीही दिली. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी तत्परता दाखवत चारही पर्यटकांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.