गोमंतकीयांच्या समाधानी वृत्तीमुळे पारंपारिक व्यवसायांवर परप्रांतीयांचा कब्जा

पणजी : गोमंतकीयांच्या समाधानी वृत्तीमुळे गोव्यातील सर्व पारंपारिक व्यवसायांवर (Traditional business) आता बाहेरील लोकांनी कब्जा केला आहे. सर्व व्यवसाय करून त्यांच्यासाठी गोवा (Goa) आता दुबई (Dubai) बनले आहे. गोमंतकीयांनी केवळ नोकरीसाठी प्रयत्न न करता काही तरी व्यवसाय सुरू करण्याच्या नजरेतून विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी केले.
साखळी रवींद्र भवनात प्रधानमंत्री रोजगार योजनेखाली पीएमईजीपी कार्यक्रमात ते बोलत होते. प्रधानमंत्री रोजगार योजनेखाली उद्योग खात्याने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते काही उद्योजकांचा सत्कार करण्यात आला.
मुद्रा लोन, प्रधानमंत्री रोजगार योजना अशा विविध योजना आहेत. याचा लाभ घेऊन तरुणांनी आवड असलेला व पारंपारिक व्यवसाय सुरू करायला हवा. व्यवसाय सुरू करण्यासाठी केवळ पैसेच असले म्हणून होत नाही. मेहनत तसेच आपले डोके चालवण्याची गरज आहे. मी कुणीही भेटला की कसला व्यवसाय करतो? असा प्रश्न करतो. त्याला मी त्याची कमाई विचारतो. उत्सुकतेने मी ही चौकशी करतो.
यावेळी रत्नदीप सावंत यांचा सत्कार करण्यात आला. पारंपारीक शिंपी व्यवसाय पुढे नेताना त्यांनी टी शर्ट तयार करून त्यांची विक्री सुरू केली. त्यांची महिन्याची कमाई दीड लाख रुपये आहे. हे उदाहरण मुख्यमंत्र्यांनी दिले. नोकरी करत असल्यास तुमचा पगार ५० ते ६० हजारपर्यंत असतो. व्यवसायात तुम्ही लाखावर पैसे जोडू शकता. अन्न प्रक्रीया, केटरिंग अशा व्यवसायांमध्ये बऱ्याच संधी आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.