अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण : कृत्रिम पायांमुळे जगणे होणार सुसह्य

फुलराणी किनळेकर हिला कृत्रिम पाय भेट दिल्यानंतर गुरुप्रसाद पावसकर, डॉ. राजेंद्र कशावकर, डॉ. अनिल संती आणि रोटरी क्लबचे पदाधिकारी.
पेडणे : आयुष्यात पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहता येईल, हे कधीच शक्य होणार नाही, अशी निराशेची भावना मनात घेऊन जगणाऱ्या दिव्यांग फुलराणी किनळेकर यांच्या आयुष्यात अखेर आशेचा किरण उजळला आहे. दिव्यांग राज्य आयुक्त गुरुप्रसाद पावस्कर, रोटरी क्लब ऑफ बार्देझ कोस्टलचे सन्माननीय सदस्य तसेच डॉ. राजेंद्र कशावकर आणि डॉ. अनिल संती यांच्या सहकार्याने फुलराणी यांना कृत्रिम पाय भेट देण्यात आले. या मदतीमुळे फुलराणी यांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले असून त्यांच्या आयुष्याला नवसंजीवनी मिळाली आहे.
पणजी येथे आयोजित केलेल्या खास कार्यक्रमात हे कृत्रिम पाय फुलराणी किनळेकर हिला देण्यात आले. कृत्रिम पाय मिळाल्यानंतर भावना व्यक्त करताना फुलराणी किनळेकर म्हणाल्या की, तुमच्या दयाळूपणाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. तुम्ही मला केवळ कृत्रिम पाय दिले नाहीत, तर स्वतंत्रपणे जगण्याची आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याची नवी उमेद दिली आहे.
रोटरी क्लब ऑफ बार्देझ कोस्टलच्या सदस्यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचेही सर्वत्र कौतुक होत आहे. गरजू व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण करण्यासाठी क्लबने दिलेल्या सहकार्यामुळे फुलराणी यांना नव्या आयुष्याची दिशा मिळाली आहे.
यावेळी डॉ. राजेंद्र कोरगावकर आणि डॉ. अनिल कोरगावकर यांनीही विशेष मेहनत घेत फुलराणी यांच्यासाठी योग्य कृत्रिम पाय उपलब्ध करून दिले. त्यांच्या समर्पणामुळे आणि वैद्यकीय सेवेमुळे फुलराणी यांना पुन्हा चालण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. यावेळी फुलराणी किनळेकर यांनी सर्वांचे आभार मानताना सांगितले की, आज मी पुन्हा आत्मविश्वासाने उभी आहे. माझ्या आयुष्यात आनंद आणि आशा परत आणण्यासाठी मी सर्वांची सदैव ऋणी राहीन.
आठ वर्षांची प्रतीक्षा संपली
आठ वर्षांपूर्वी एका शिबिरात फुलराणी यांनी कृत्रिम पायांच्या सहाय्याने चालण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, या उपचारांचा अवाढव्य खर्च पाहता हे स्वप्न पूर्ण होणे कठीण वाटत होते. त्यावेळी दिव्यांग राज्य आयुक्त गुरुप्रसाद पावस्कर यांनी फुलराणी यांना ‘एक दिवस हे स्वप्न नक्की पूर्ण होईल,’ असा विश्वास दिला होता. आज ते वचन सत्यात उतरले आहे. पणजी येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात त्यांना हे कृत्रिम पाय प्रदान करण्यात आले.