गोव्यातील सांगोल्डा येथे स्वयंअपघातात बारामतीमधील युवक ठार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
07th May, 10:44 am
गोव्यातील सांगोल्डा येथे स्वयंअपघातात बारामतीमधील युवक ठार

म्हापसा : सांगोल्डा येथे चोगम रस्त्यावर एका रेस्टॉरंटच्या संरक्षक भिंतीला दुचाकीची धडक बसली. या स्वयंअपघातात (Self accident) विकास रमेश सोलट (२४, रात. बारामती पूणे)  (Baramati, Pune) हा दुचाकीस्वार युवक ठार झाला. मयत युवक हा पर्वरीतील मॅजेस्टिक कॅसिनोमध्ये नोकरीला होता.

हा अपघात गुरुवारी पहाटे ४.३० च्या सुमारास घडला. मयत विकास हा कामावरून सुटल्यानंतर आपल्या एमएच ४२ बीएल ६९२१ क्रमांकाच्या यामाहा आर वन मोटरसायकलवरून सांगोल्डा येथे खोलीवर जात होता. वाटेत चोगम रस्त्यावरील वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सूटले व विरुद्ध दिशेने जात कासा दी गेस्टर या रेस्टॉरंटच्या संरक्षक भिंतीला मोटरसायकल जाऊन धडकली. 

 या अपघातात मयत दुचाकीस्वाराचे हेल्मेट संरक्षक भिंतीला आदळून फुटले आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या जखमीला रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

 अपघाताचा पंचनामा साळगाव पोलीस (Goa Police)  उपनिरीक्षक अक्षय गावकर व हवालदार सुदेश नाईक यांनी केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा