गहाण ठेवलेली मालमत्ता तारण ठेवून ६.१९ कोटींचे घेतले कर्ज

पणजी : वेगवेगळ्या बँकेत गहाण ठेवलेली मालमत्ता तारण ठेवून ६.१९ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन कॅनरा बँकेची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गोवा विभागाने गुरुवारी क्राऊन मिनरल ट्रेडिंग कंपनीच्या भागीदार रियाझ शेख, सूरज मास्कारेन्हस आणि आदित्य आंगले यांच्या ६ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. यात ईडीने ६२.५ लाख रोख रकमेसह भागीदारांचे मोबाईल फोन, लॅपटाॅप, महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले.
केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने (सीबीआय) ३१ मार्च २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, कॅनरा बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक व सर्कल प्रमुख (कर्नाटक) रामा नाईक यांनी २४ डिसेंबर २०२१ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, क्राऊन मिनरल ट्रेडिंग कंपनीने कॅनरा बँकेच्या मडगाव शाखेकडून १३ ऑक्टोबर २००९ रोजी ६.१९ कोटी रुपये कर्ज घेतले होते. यासाठी कंपनीने दोन सदनिका आणि तीन दुकाने तारण ठेवली होती. या व्यतिरिक्त कंपनीने ४.२७ कोटी रुपये किमतीचा नवीन क्रशिंग प्लांट तारण ठेवला. कालांतराने ३० सप्टेंबर २०१३ रोजी कंपनीला संबंधित कर्ज फेडता आले नाही. त्यामुळे संबंधित कर्ज एनपीएत समाविष्ट करण्यात आले होते. याच दरम्यान सदर मालमत्तेची विक्री करून कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी बँकेने चौकशी सुरु केली होती. त्यावेळी संबंधित मालमत्ता कर्ज घेण्यापूर्वी म्हणजे १२ सप्टेंबर २००८ आणि १८ सप्टेंबर २००८ रोजी मडगाव अर्बन सहकारी बँक लिमिटेडकडे तारण ठेवल्याची माहिती मिळाली. याशिवाय संबंधित मालमत्ता वेगवेगळ्या बँकेत तारण ठेवल्याचेही समोर आले होते. याची दखल घेऊन सीबीआयने कंपनीचे भागीदार रियाझ शेख, सूरज मास्कारेन्हस, मृत मेलवीन मास्कारेन्हस आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली.
दरम्यान, वरील प्रकरणात मनी लाँड्रिंगचा संशय व्यक्त करून ईडीने कारवाई सुरू केली. याच दरम्यान ईडीने आॅगस्ट २०२५ मध्ये कंपनीच्या भागीदारांची २.८६ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये भागीदार रियाझ शेख याच्या मालकीचे धारबांदोडा येथील २२ भूखंड, कुंकळ्ळी येथील दोन भूखंड आणि व्यवस्थापकीय भागीदार आदित्य आंगले यांच्या मालकीचा फातोर्डा येथील एक 'रो - व्हिला' यांचा समावेश आहे.
दरम्यान, ईडीचे संयुक्त संचालक अजय लुहाच यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक प्रफुल्ल वाबळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुरुवारी कंपनीच्या भागीदार रियाझ शेख, सूरज मास्कारेन्हस आणि आदित्य आंगले याच्याशी निगडित सहा ठिकाणी छापा टाकला. त्यात उत्तर गोव्यात करंझाळे, म्हापसा, बेती, पर्वरी तर दक्षिण गोव्यात उसगाव आणि मडगावचा समावेश आहे. ईडीने ६२.५ लाख रोख रकमेसह भागीदारांचे मोबाईल, लॅपटाॅप, दस्तावेज जप्त केले.