कुंकळ्ळी पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हा

मडगाव : दिल्ली पोलीस दलातील अधिकारी असल्याचे भासवून कुंकळ्ळी येथील सुप्रिया देसाई या महिलेची दोन लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आर्थिक फसवणुकीची ही घटना २२ एप्रिल रोजी घडली. कुंकळ्ळी- कुळवाडा येथील सुप्रिया देसाई यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. त्याने आपण दिल्ली पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. तुमच्या विरोधात गंभीर तक्रार आली असून अटक वॉरंट निघणार आहे, असे सांगत अटक होण्याची भीती घातली. या प्रकरणातून सुटका करून घ्यायची असल्यास व हे प्रकरण मिटवण्यासाठी संशयिताने पैशांची मागणी केली.
अटकेच्या भीतीने पीडित महिला घाबरली आणि तिने या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी संशयिताने सांगितलेल्या बँक खात्यावर २ लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. काही कालावधीनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने प्रथम सायबर क्राईम पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण अधिकृत तपासासाठी कुंकळ्ळी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. कुंकळ्ळी पोलिसांनी या आर्थिक फसवणूकप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य सावंत या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
कोणत्याही व्यक्तीने पोलीस किंवा सरकारी अधिकारी असल्याचे सांगून पैशांची मागणी केल्यास घाबरून जाऊ नका. अशावेळी तातडीने जवळच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.