घरातील साहित्य जळून खाक; जीवितहानी नाही

मडगाव : येथील मालभाट परिसरात एका घराला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीमुळे घरातील साहित्य जळून खाक झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सोमवारी सायंकाळी मालभाट येथील एका निवासी घराला अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा आणि धूर पाहून नागरिकांनी तातडीने मडगाव अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असे सांगितले जात आहे. मात्र अजूनही नेमके कारण समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे आग शेजारच्या घरांपर्यंत पसरली नाही. मडगाव अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण आणण्यासाठी दोन गाड्यांनी पाण्याचा मारा केला. याशिवाय वेर्णा येथील गाडीला पाचारण केलेले होते. मात्र, ती गाडी येईपर्यंत आगीवर नियंत्रण आणण्यात आले होते.