कुठ्ठाळी येथील २५ वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

वास्को : वडिलांच्या निधनामुळे मानसिक तणावाखाली असलेल्या कुठ्ठाळी येथील २५ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने शेजाऱ्याला फोन करून आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची विनंती केली होती. या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाझेंटार-कुठ्ठाळी येथील २५ वर्षीय युवतीने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या आईची चौकशी केली असता, ती बाजारात गेली असताना शेजाऱ्याचा फोन आल्याचे तिने सांगितले. शेजाऱ्याने सांगितले की, संबंधित युवतीने त्याला फोन करून आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची विनंती केली होती. तिचा आवाज संशयास्पद वाटल्याने शेजारी तातडीने तिच्या घरी धावला. घरी पोहोचल्यावर घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याने बेडरूमची काच फोडून आत पाहिले असता, युवतीने छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. शेजाऱ्याने ही माहिती दिल्यानंतर तिची आई तातडीने घरी पोहोचली. काही मजुरांच्या मदतीने बेडरूमचा दरवाजा तोडण्यात आला आणि युवतीला खाली उतरविण्यात आले. त्यानंतर तिला उपचारासाठी चिखली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सदर युवती दुबई येथे काम करत होती. जानेवारी महिन्याच्या मध्यातच ती दुबईहून परतली होती. सुमारे महिनाभरापूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाल्याने ती नैराश्यात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.