चेन्नई एक्सप्रेस सुसाट; मुंबई इंडियन्सचा ८ गडी राखून धुव्वा

ऋतुराज गायकवाड, कार्तिक शर्मा यांची अर्धशतके

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
02nd May, 11:57 pm
चेन्नई एक्सप्रेस सुसाट; मुंबई इंडियन्सचा ८ गडी राखून धुव्वा

चेन्नई: आयपीएल २०२६ च्या ४४ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने आपल्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा ८ गड्यांनी पराभव करत दिमाखदार विजय मिळवला. मुंबईने विजयासाठी दिलेले १६० धावांचे लक्ष्य चेन्नईने १८.१ षटकांत केवळ २ गडी गमावून सहज पूर्ण केले.
१६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात सलीमीवीर संजू सॅमसनच्या (११ धावा) रूपाने लवकर बाद झाल्यामुळे अडखळली होती. मात्र, त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि कार्तिक शर्मा यांनी मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत सामन्यावर पकड मिळवली. गायकवाडने ४८ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ६७ धावांची खेळी केली. त्याला कार्तिक शर्माने ४० चेंडूंत ५४ धावांची नाबाद अर्धशतकीय खेळी करून मोलाची साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ९८ धावांची अभेद्य भागीदारी करत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मध्य फळीत उर्वील पटेलने अवघ्या १२ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांसह २४ धावांची आक्रमक खेळी करत धावगती वाढवण्यास मदत केली.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना चेन्नईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवता आला नाही. जसप्रीत बुमराहने ३ षटकांत २० धावा देत १ बळी घेतला, तर फिरकीपटू ए. एम. गझनफरने ४ षटकांत ४० धावांच्या मोबदल्यात १ गडी बाद केला. ट्रेंट बोल्ट आणि कर्णधार हार्दिक पांड्या हे गडी बाद करण्यात अपयशी ठरले आणि त्यांनी अनुक्रमे ११.७० आणि ८.५० च्या सरासरीने धावा दिल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर विल जॅक्स अवघ्या १ धावेवर बाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर रायन रिकलटन (३७ धावा) आणि नमन धीर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. नमन धीरने ३७ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. मधल्या फळीत सूर्यकुमार यादवने १२ चेंडूंत २१ धावा करून डावाला वेग देण्याचा प्रयत्न केला, पण तो मोठी खेळी करू शकला नाही.
कर्णधार हार्दिक पांड्याला आजच्या सामन्यात संघर्ष करावा लागला. त्याने २३ चेंडूंत केवळ १८ धावा केल्या. तिलक वर्मा (५ धावा) आणि रॉबिन मिन्झ (५ धावा) स्वस्त्यात बाद झाल्यामुळे मुंबईचा डाव मधल्या षटकांत अडखळला. अखेरच्या षटकांत क्रिश भगत (३) आणि ट्रेंट बोल्ट (७) यांनी नाबाद राहत संघाला १५९ धावांपर्यंत पोहोचवले.
अंशुल कंबोजची भेदक गोलंदाजी
चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी आज घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवले. युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने ४ षटकांत ३२ धावा देऊन ३ महत्त्वाचे बळी टिपले. त्याला फिरकीपटू नूर अहमदने उत्तम साथ देत २ गडी बाद केले. जेमी ओव्हरटन आणि रामकृष्ण घोष यांनी प्रत्येकी १ बळी घेत मुंबईच्या धावसंख्येवर अंकुश ठेवला. ओव्हरटनने ४ षटकांत केवळ २३ धावा देऊन अत्यंत कंजूस गोलंदाजी केली.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : १५९-७ (२० षटके), नमन धीर: ५७ (३७), रायन रिकलटन: ३७ (२४), अंशुल कंबोज ३२/३, नूर अहमद २६/२
चेन्नई सुपर किंग्स : १६०-२ (१८.१ षटके), ऋतुराज गायकवाड: ६७ (४८), कार्तिक शर्मा: ५४ (४०), ए. एम. गझनफर : ४०/१, जसप्रीत बुमराह २०/१
चेन्नईसाठी सर्वाधिक वेळघ ५० पेक्षा अधिक धावा करणारे फलंंदाज
सुरेश रैना: ३४ वेळा (१७१ डावात)
ऋतुराज गायकवाड: २४ वेळा (७९ डावात)
एम. एस. धोनी: २२ वेळा (२१५ डावात)
फाफ डु प्लेसिस: २० वेळा (८६ डावात)