महिला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडेच नेतृत्व : पंजाबच्या नंदनी शर्माला पहिल्यांदाच संधी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
02nd May, 11:59 pm
महिला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई : बीसीसीआयने आगामी महिला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी भारताला वनडे विश्वचषक जिंकून देणाऱ्या हरमनप्रीत कौरकडेच या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर स्मृती मनधाना उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. विशेष म्हणजे, विश्वविजेत्या वनडे संघातील ११ खेळाडूंना या टी-२० संघात स्थान मिळाले आहे.
या विश्वचषकाचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले असून १२ जूनपासून स्पर्धेला सुरुवात होईल. भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात १४ जून रोजी बर्मिंगहॅम येथे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. या निवडीवेळी कर्णधार हरमनप्रीत कौर, प्रशिक्षक अमोल मजूमदार, निवड समितीच्या अध्यक्षा अमिता शर्मा आणि बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया उपस्थित होते.
स्मृती मनधाना आणि शेफाली वर्मा डावाची सुरुवात करतील, तर जेमिमा रॉड्रिग्स तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. कर्णधार हरमनप्रीत कौर चौथ्या क्रमांकावर महत्त्वाची भूमिका बजावेल. यष्टीरक्षक म्हणून ऋचा घोषची निवड झाली असून, यास्तिका भाटिया बॅकअप यष्टीरक्षक आणि सलामीवीर म्हणून संघात असेल. वेगवान गोलंदाजीची धुरा रेणुका सिंह ठाकूरकडे असून तिला क्रांती गौड आणि अरुंधती रेड्डी साथ देतील. फिरकी विभागाचे नेतृत्व दीप्ती शर्मा करेल, तर श्रेयांका पाटील आणि एन. श्रीचरणी तिला साथ देतील. पंजाबच्या नंदनी शर्माला पहिल्यांदाच विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली आहे.
या स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी होणार असून त्यांची प्रत्येकी ६ संघांच्या दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताचा समावेश ‘गट अ’ मध्ये असून यात पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँड्स या संघांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), भारती फुलमाळी, श्री चरणी, यस्तिका भाटिया, नंदनी शर्मा, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंह ठाकूर, श्रेयांका पाटील आणि राधा यादव.