ई-सिगारेट ओढताना कॅमेरात कैद : स्पष्टिकरण मागवले

जयपूर : आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग नव्या वादात सापडला आहे. पंजाब किंग्सविरुद्ध मंगळवारी झालेल्या सामन्यादरम्यान तो ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट (वेप) वापरताना कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या प्रकरणाची दखल घेतल्याचे समोर आले आहे.
एका वृत्तानुसार, बीसीसीआय अधिकाऱ्याने या घटनेची पुष्टी करत रियान परागकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले असल्याची माहिती दिली आहे. हा प्रकार बोर्ड गंभीरतेने घेत असल्याचे मानले जात आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ राजस्थानच्या डावातील १६व्या षटकादरम्यानचा असल्याचे सांगितले जात आहे. यात रियान पराग, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वाल यांच्या उपस्थितीत ड्रेसिंग रूममध्ये बसलेला दिसतो. त्यावेळी तो ई-सिगारेट वापरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भारत सरकारने २०१९ मध्ये ई-सिगारेट निषेध कायदा (पेका २०१९) लागू करून ई-सिगारेटचे उत्पादन, विक्री, आयात, साठवणूक आणि जाहिरातींवर बंदी घातली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आणि तुरुंगवासाची तरतूद आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आणि आयपीएल संघाचा कर्णधार सार्वजनिकरित्या अशा वस्तूचा वापर करताना दिसणे गंभीर मानले जात आहे.
बीसीसीआयकडून कठोर कारवाईची शक्यता
या प्रकरणात बीसीसीआय सचिवांकडून प्रतिक्रिया मागवण्यात आली असून, बोर्ड शिस्तभंग कारवाई करू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दोषी आढळल्यास रियान परागवर दंड, निलंबन किंवा सामनाबंदीसारखी कारवाई होऊ शकते.