दिल्लीकडून राजस्थान ‘चितपट’

७गडी राखून पराभव : निसंका-राहुलची वादळी अर्धशतके

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
15 mins ago
दिल्लीकडून राजस्थान ‘चितपट’

जयपूर: सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या आयपीएल २०२६ च्या ४३ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने यजमान राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव केला. राजस्थानने विजयासाठी दिलेले २२६ धावांचे विशाल लक्ष्य दिल्लीने अवघ्या १९.१ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला पथुम निसंका आणि के. एल. राहुल यांनी स्फोटक सुरुवात करून दिली. निसंकाने ३३ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने के. एल. राहुलने ४० चेंडूत ७५ धावा कुटल्या, ज्यात ५ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. या दोघांनी रचलेल्या पायामुळे दिल्लीचा विजय सुकर झाला.
सलामीवीर बाद झाल्यानंतर नितीश राणाने १७ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकांत ट्रिस्टन स्टब्स (१८) आणि आशुतोष शर्मा (२५) यांनी नाबाद राहत दिल्लीला १९.१ षटकांतच विजय मिळवून दिला. आशुतोषने अवघ्या १५ चेंडूत ४ चौकार मारत आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली.
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश लावता आला नाही. जोफ्रा आर्चरने ४ षटकांत ४६ धावा देऊन १ बळी घेतला. रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या राजस्थानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (६) आणि वैभव सूर्यवंशी (४) स्वस्तात बाद झाले. मात्र, त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल आणि रियान पराग यांनी तिसऱ्या गड्यासाठी १०२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. जुरेलने २३ चेंडूत ४२ धावा केल्या.
कर्णधार रियान परागने मैदानाच्या चहूकडे फटकेबाजी करत ५० चेंडूत ९० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि तब्बल ८ उत्तुंग षटकार ठोकले. परागचे शतक अवघ्या १० धावांनी हुकले असले तरी, त्याने संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात मोलाचा वाटा उचलला.
पराग आणि रवींद्र जडेजा (२०) बाद झाल्यानंतर डोनोव्हन फरेराने सामन्याची सूत्रे हाती घेतली. फरेराने अवघ्या १४ चेंडूत ३३५.७१ च्या स्ट्राइक रेटने नाबाद ४७ धावांची वादळी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत २ चौकार आणि ६ षटकार मारले, ज्यामुळे राजस्थानला २०० धावांचा टप्पा सहज पार करता आला.
दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल स्टार्कने ४० धावा देऊन सर्वाधिक ३ बळी टिपले. अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि टी नटराजन यांना प्रत्येकी १ गडी बाद करण्यात यश आले, मात्र त्यांना राजस्थानच्या धावांच्या गतीवर अंकुश लावता आला नाही.
जैस्वालचा विक्रम
दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज मिचेल स्टार्क जेव्हा सामन्याचा पहिला चेंडू टाकण्यासाठी आला, तेव्हा यशस्वी जैस्वालने स्क्वेअर लेगच्या दिशेने एक जोरदार फटका मारून चेंडू थेट सीमारेषेबाहेर पाठवला. या षटकारासह जैस्वाल आयपीएलच्या इतिहासात सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा केवळ पाचवा फलंदाज ठरला आहे. मात्र, मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला आणि याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तो स्टार्कलाच झेल देऊन बसला. यापूर्वी आयपीएलमध्ये चार खेळाडूंनी हा पराक्रम केला असून यशस्वी जैस्वाल पाचवा खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे, टी-२० फॉरमॅटमध्ये डावाच्या पहिल्या चेंडूवर सर्वात जास्त वेळा षटकार मारण्याचा विक्रमही जैस्वालच्याच नावावर असून, त्याने तब्बल चौथ्यांदा हा पराक्रम केला आहे. या यादीत प्रियांश आर्या दोन वेळा डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून दुसऱ्या स्थानावर आहे.
आयपीएल सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारे खेळाडू
नमन ओझा (राजस्थान रॉयल्स) – विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (२००९, डर्बन)
विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) – विरुद्ध राजस्थान रॉयल्स (२०१९, कोलकाता)
फिल सॉल्ट (कोलकाता नाईट रायडर्स) – विरुद्ध मुंबई इंडियन्स (२०२४)
प्रियांश आर्य (पंजाब किंग्स) – विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (२०२५)
यशस्वी जैस्वाल (राजस्थान रॉयल्स) – विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (२०२६)
राजस्थान रॉयल्सच्या सर्वाधिक सांघिक धावसंख्या
२४२/६ विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, हैदराबाद (२०२५)
२२८/६ विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, जयपूर (२०२६)
२२८/४ विरुद्ध पंजाब किंग्स, मुल्लानपूर (२०२६)
२२६/६ विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब, शारजाह (२०२०)
२२५/६ विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, जयपूर (२०२६)
राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराची सर्वोच्च धावसंख्या
११९ (६३) - संजू सॅमसन विरुद्ध पंजाब किंग्स, वानखेडे (२०२१)
९५ (४५) - रियान पराग विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता (२०२५)
९० (५०) - रियान पराग विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, जयपूर (२०२६)
पहिल्याच चेंडूवर सर्वाधिक वेळा षटकार मारणारे खेळाडू
४ - यशस्वी जयस्वाल
२ - प्रियांश आर्य
१ - नमन ओझा
१ - मयंक अग्रवाल
१ - सुनील नरेन
१ - विराट कोहली
१ - रॉबिन उथप्पा
१ - फिल सॉल्ट
१ - संजू सॅमसन
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स: २० षटकांत २२५-६ (रियान पराग ९०, डोनोव्हन फरेरा ४७, ध्रुव जुरेल ४२; मिचेल स्टार्क ३/४०).
दिल्ली कॅपिटल्स: १९.१ षटकांत २२६-३ (के. एल. राहुल ७५, पथुम निसंका ६२, नितीश राणा ३३; रवींद्र जडेजा १/३३).