सत्तरीचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर

मोर्लेतील जलप्रकल्प अंतिम टप्प्यात; ११ गावांना मिळणार दिलासा


11 mins ago
सत्तरीचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर

मोर्लेतील जलप्रकल्पाचे सुरू असलेले काम.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई : सत्तरी तालुक्यातील अनेक गावांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील सुमारे ११ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, मोर्ले येथे १०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेला पाणी प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सध्या सत्तरीतील ११ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ‘दाबोस’ पाणी प्रकल्पातून या गावांना पाणीपुरवठा केला जात होता, मात्र ही गावे भौगोलिकदृष्ट्या उंचावर आणि टोकाच्या भागात असल्यामुळे तिथे पाण्याचा पुरेसा दाब मिळत नाही. यामुळे या भागात पाणीटंचाई निर्माण होते. टँकर वेळेवर येत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नव्या प्रकल्पामुळे ही डोकेदुखी कायमची थांबणार आहे.
पर्ये मतदारसंघातील मोर्ले, होंडा, पिसुर्ले आणि भिरोंडा या चार मुख्य पंचायतींना या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे. याशिवाय पर्ये पंचायतीच्या काही भागांनाही याचा फायदा मिळेल. विशेषतः होंडा आणि पिसुर्ले या खाणग्रस्त भागांतील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्यामुळे तिथे पाण्याची मोठी समस्या आहे. हा प्रकल्प या भागासाठी जीवनदायिनी ठरणार आहे.
प्रकल्पासाठी १०० कोटींचा खर्च अपेक्षित
मोर्ले येथील हा प्रकल्प जलस्रोत खाते आणि पाणीपुरवठा खाते यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जलस्रोत खाते वाळवंटी नदीचे पाणी एका जलकुंभात साठवून ते पाणीपुरवठा खात्याकडे देईल. त्यानंतर या पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून ते गावांना पुरवले जाईल. जलस्रोत खात्याचे काम पूर्ण झाले असून पाणीपुरवठा खात्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील ९० दिवसांत तांत्रिक कामे पूर्ण होऊन प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होण्याची चिन्हे आहेत.            

हेही वाचा