कामगारांच्या कल्याणासाठी गोवा सरकारकडून पाच नव्या योजनांची घोषणा

मुख्यमंत्री म्हणाले-गोव्यात कामगारांना अपघाती विम्याखाली मिळणार पन्नास हजारांची आर्थिक मदत

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
12 mins ago
कामगारांच्या कल्याणासाठी गोवा सरकारकडून पाच नव्या योजनांची घोषणा

पणजी: कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी गोवा सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. कामगार दिनानिमित्त पणजी येथील लोकभवन येथे आयोजित सरकारी कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कामगारांसाठी पाच नवीन योजनांची घोषणा केली. या वेळी कामगार मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले की, कामगारांना अपघाती मृत्यू आल्यास त्यांच्या कुटुंबीयांना पन्नास हजार रुपयांची, तर अपघातात जखमी झाल्यास पंचवीस हजार रुपयांची आर्थिक भरपाई देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी कामगार खात्याकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. सध्या राज्यात एक लाख चाळीस हजार कामगारांची नोंदणी झाली आहे.

देशाच्या आणि राज्याच्या विकासात कामगारांचे योगदान अत्यंत मोठे असून, २०३७ पर्यंत विकसित गोवा बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कामगारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पूर्वीप्रमाणेच आता खासगी क्षेत्रातही चांगला पगार मिळत असल्याने कामगारांचे जीवनमान सुधारत आहे. तसेच, वीस वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावलेल्या निवडक कामगारांचा या वेळी सत्कार करण्यात आला आणि यापुढेही अशा कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

या कार्यक्रमात जाहीर करण्यात आलेल्या पाच नवीन योजनांमध्ये कामगारांसाठी डिजिटल साक्षरता, ज्येष्ठ कामगारांच्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत, आयआयटी आणि नीटसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी कोचिंग फी तसेच उच्च शिक्षणासाठी ट्युशन फी माफ करण्याचा समावेश आहे. यामुळे कामगारांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण आणि सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. सर्व प्रकारच्या कामगारांनी, विशेषतः कारखाने आणि बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी वेळेवर नोंदणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

हेही वाचा