ग्रामस्थांचा आरोप : सरकारी यंत्रणेसह पंचायतीवर ठपका

फोंडा : बेतोडा येथील औद्योगिक वसाहत जवळील खासगी जागेची बोगस कागदपत्रे तयार करून प्लॉटची विक्री करण्यात आली आहे. बोगस कागदपत्रे करण्यात सरकारी यंत्रणाबरोबर स्थानिक बेतोडा पंचायतीचा मोठा वाटा आहे. सरकारवर विश्वास नसल्यामुळे जागेच्या मालकांना न्यायालयात धाव घेण्याची वेळ आली असल्याची माहिती गुरुवारी ग्रामस्थांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
जागेचे मालक असताना काही जणांनी बोगस कागदपत्रे तयार करून अंदाजे ३०० प्लॉट तयार केले. त्यावेळी अनेक झाडांची कत्तल सुद्धा करण्यात आली होती. आतापर्यंत ५० पेक्षा अधिक प्लॉट विक्री करून काही जणांनी ४० ते ५० कोटी रुपये जमा केले आहे. विविध खात्यांकडे तक्रारी दाखल केल्या तरी कारवाई झाली नसल्यामुळे जागेच्या मालकांना न्यायालयात धाव घेण्याची वेळ आली आहे. यात सरकारी अधिकारी पूर्णपणे गुंतल्याचा आरोप जागेचे मालक करीत आहेत. बोगस कागदपत्रे तयार करून बनावट सह्या सुद्धा घेतल्याची माहिती उघड झाली आहे.
यावेळी अधिक माहिती देताना ज्ञानेश्वर खांडेपारकर यांनी विविध सरकारी खात्यांच्या अधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक पंचायतीच्या माजी सरपंचाने केलेला घोळ जागेच्या मालकांसाठी हानिकारक ठरलेला आहे. स्वतःच्या जागेत जाण्यात मालकांना मिळत नसल्याने प्रकरण आता न्यायालयात नेण्याची वेळ आली आहे. काही महिन्यांपूर्वी एसआयटीमध्ये केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून, एका व्यक्तीला पोलिसांनी अटकही केली आहे. उर्वरित काही जणांना अटक होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बेतोडा पंचायतीचे माजी सरपंच व सचिवांवरही कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
...म्हणून मागितली न्यायालयात दाद!
जागेसंबंधी विविध खात्यांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, कोणत्याच अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही. त्यामुळे सरकार बद्दलचा विश्वास उडालेला असून न्यायासाठी न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे उच्चारी गावडे यांनी सांगितले.