
पणजीः एआयमध्ये कोकणीचा समावेश व्हावा यासाठी ‘कोंकणी लार्ज लेन्गवेज मोड्यूल’ (एलएलएम) तयार करण्यासाठी सुरूवात केली आहे. या एलएलएमच्या अंमलबजावणीसाठी आम्ही भाषीणी बरोबर सामंजस्य करार केला आहे. काही दिवसांनी कोंकणीतून एआयचा वापर सुरू होणार; अशी माहिती माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी दिली.
सध्या एआयने (AI) इतर भाषांमध्ये मजल मारली आहे पण कोकणीच्या (Konkani) बाबतीत एआय अजून कच्चा आहे. चॅट जीपीटी, डिपसीक सारखे एआय कोकणीचा कमांड घेत नाहीत. तसेच इंग्रजीचा कोकणी अनुवाद करून देतात आणि त्यात जास्त मराठीच्या शब्दांचा समावेश असतो. सध्या गुगल (Google) जेमीनी एआयने कोकणीचा हात जरा घट्ट पकडला आहे. कमांड सोडल्यास इंग्रजीचा कोकणी अनुवाद ८० टक्के अचूक असतो. यासंदर्भातील प्रश्न माहिती तंत्रज्ञानमंत्री खंवटे यांना विचारला.
अमेरिकेत (USA) राहत असलेल्या गोमंतकीयाने गुगलसाठी कोकणी भाषा तयार केली. मडगावात राहणारे आणि गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संजीत हेगडे देसाई यांनी ही कामगिरी केली. आता आम्ही एक पाऊल पुढे जाऊन भाषीणी बरोबर सामंजस्य करार करून आम्ही एक कोकणी एलएलएम तयार करतो, असे खंवटे यांनी सांगितले.
या माध्यमातून कोकणी सर्व शब्द जाग्यावर पडणार आणि लोकांना एआयचा वापर कोकणीतून करणे शक्य होणार. याच्या पुढे मजकूर इंग्रजीतून घातल्यावर त्याचा स्पष्ट अनुवाद कोकणीतून होणार. ही एक बोली भाषा आहे; त्याला वेळ लागणार आणि ते एका रात्रीत होऊ शकत नाही. काही दिवसांनी कोकणी आम्हाला एआयवर बघायला मिळणार, अशी माहिती खंवटे यांनी दिली.
तसेच सरकारी सेवा कोकणी आणि मराठी भाषेत उपलब्ध असणार. ‘चॅटबॉट्स’ आणि इतर एआय माध्यमांतून नागरिकांना २४ तास सरकारबरोबर संवाद साधता येणार. पर्यटन, शेती, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रातही एआय-चा उपयोग होणार.