दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण; शनिवार जाहीर होईल निकाल.

पणजी : वास्को येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित गौतम खट्टर याच्या जामीन अर्जावर वास्को प्रथमवर्ग न्यायालयाने आपला अंतिम निर्णय राखून ठेवला आहे. या प्रकरणावरील युक्तिवाद गुरुवारी पूर्ण झाला असून, शनिवार, २ मे रोजी सकाळी १० वाजता यावर अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, संशयित गौतम खट्टर यांच्या वतीने बाजू मांडताना ॲड. अमेय प्रभूदेसाई यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले की, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी किंवा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची आता कोणतीही आवश्यकता उरलेली नाही. ॲड. प्रभूदेसाई यांनी युक्तिवादात नमूद केले की, पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व तांत्रिक पुरावे आधीच गोळा केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि संशयिताची व्हॉईस रेकॉर्डिंग यांचा समावेश आहे. तसेच, गोळा करण्यात आलेले आवाजाचे नमुने पुढील सखोल तपासणी आणि पडताळणीसाठी पुण्याच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांकडे पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे तपासात कोणतीही बाधा येत नाही तसेच संशयिताला जामीन नाकारण्याचे कोणतेही सबळ कारण नाही, असा दावा बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणातील पुढील आदेश आणि रिमांडवरील सुनावणी आता शनिवार, २ मे रोजी होणार आहे.
या अटकेची पार्श्वभूमी पाहिली तर, वास्को येथील जाहीर कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केल्यापासून गौतम खट्टर हा गोव्यातून पसार झाला होता. तो हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील एका दुर्गम भागातील मराल येथील टेकडीवरील श्री नीळकंठ मंदिर परिसरातील एका घरात लपून बसला होता. गोव्यातून पसार झाल्यानंतर त्याने आपला मोबाईल पूर्णपणे बंद ठेवला होता. यामुळे त्याचा माग काढणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान बनले. मात्र, गोवा क्राईम ब्रांचच्या पथकाने अत्यंत चिकाटीने उत्तराखंड ते हिमाचल प्रदेश असा सलग पाठलाग केला.
तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचे नेमके स्थान निश्चित केले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध 'लूक आऊट नोटीस' आणि अजामीनपात्र वॉरंट जारी केले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु हिमाचल पोलिसांनी मराल येथील चेक नाक्यावर सापळा रचून त्याला त्याच्या कारसह ताब्यात घेतले. २४ एप्रिल रोजी सायंकाळी ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. त्यानंतर, गोवा क्राईम ब्रांचचे निरीक्षक परेश नाईक, पोलीस उपनिरीक्षक माधव नाईक आणि हवालदार नवीन पालयेकर यांच्या पथकाने त्याला तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर रविवारी दुपारी मोपा विमानतळावर आणले आणि नंतर रायबंदर येथील गुन्हे शाखेत आणण्यात आले. रविवारी त्याला वास्को प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाकडून त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.