पुढील वर्षासाठी अतिरिक्त उपाययोजना करणार

पणजी : राज्यातील विविध धरणांमध्ये पुढील दीड ते दोन महिने पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. आवश्यक असल्यास काटकसर करून पाणीसाठा आणखी दिवस पुरेल याची खात्री केली जाणार आहे. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेबाबत कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. पुढील वर्षी धरणातील पाणीसाठा वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. गुरुवारी त्यांनी याविषयी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री शिरोडकर यांनी सांगितले की, दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या साळावली धरणात ३० एप्रिल अखेरीस ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा पुढील दोन महिने पुरू शकतो. अंजुणे धरणात २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येथून शेतीसाठी सध्या २.०७ क्युमसेक पाणी सोडले जात आहे. १ मे पासून ते कमी करून १.६ क्युमसेक सोडले जाईल. यामुळे येथील पाणीसाठा अधिक काळ पुरणार आहे. आमठाणे धरणात ४४ टक्के पाणी शिल्लक आहे. आपत्कालीन परिस्थितीत शापोरा नदीचे पाणी पंप करून येथील पाणीसाठा ६० टक्के पर्यंत वाढवता येतो.
ते म्हणाले, पंचवाडी धरणात मागील वर्षी ३० एप्रिल रोजी येथे ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा तेथे ३ टक्के अधिक म्हणजेच ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गरज असल्यास शिरोडा आणि बोरीसाठी साळावलीमधील पाणी उपसा करता येते. ३० मे पासून कुशावती नदीचे पाणी उपसा केले जाईल. यामुळे अतिरिक्त ३० एमएलडी पाणी मिळणार आहे. याशिवाय पुढील वर्षापासून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार जलवाहिनेद्वारे पाणी पुरवले जाईल. तसेच १ मे पासून खाणींच्या खंदकातील पाणी ओपामध्ये सोडण्यात येणार आहे.
पुढील वर्षी अंजुणेतील गाळ उपसणार
मागील काही वर्षे अंजुणे धरणातील गाळ उपसा केलेला नाही. येथील पाणीसाठा वाढवण्यासाठी पुढील वर्षी धरणातील गाळ उपसा केला जाणार आहे. यामुळे येथील पाणीसाठा एक महिना अधिक काळ पुरणार असल्याचे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.
चिंबलमध्ये बोअरवेल सील प्रक्रिया
चिंबल येथील बोअरवेल सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही ठिकाणी बोअरवेल झाकून ठेवल्याने अडचण येत आहे. आवश्यक असल्यास सील करण्यासाठी मुदत वाढवून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.