गुन्हा शाखेचे २२ जणांचे पथक सोमवारी दिल्लीला रवाना झाले होते.

पणजी : दोनापावला आणि म्हापसा येथील बंगल्यांवर सशस्त्र दरोडे टाकून लाखो रुपयांचा ऐवज पळवणाऱ्या बांगलादेशी टोळीच्या पाच संशयितांना गोवा पोलिसांनी गुरुवारी सकाळी मडगाव रेल्वे स्थानकावर आणले. गेल्या अनेक महिन्यांपासून गोव्याला 'मोस्ट वॉन्टेड' असलेल्या या टोळीचा दिल्ली पोलिसांनी १५ दिवसांपूर्वी एका थरारक चकमकीनंतर नायनाट केला होता. या टोळीने गोव्यासह कर्नाटक, दिल्ली आणि केरळसारख्या राज्यांतही धुमाकूळ घातला होता.
गोवा गुन्हे शाखेच्या गोपनीय माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी १४ आणि १५ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्री ही मोठी कारवाई केली. दिल्लीतील सराय काले खान स्मशानभूमीजवळील जंगलात ही टोळी एका नवीन दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या परिसराला वेढा घातला असता, सशस्त्र दरोडेखोरांनी थेट गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर देत या सहा अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या, मात्र दोन संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

गोव्याच्या गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तगुरु सावंत आणि निरीक्षक किशोर रामानन यांच्या नेतृत्वाखालील २२ जणांच्या पथकाने या संशयितांना ट्रान्स्फर वॉरंटवर ताब्यात घेण्यासाठी दिल्ली गाठली होती. गुरुवारी गोव्यात आणलेल्या संशयितांमध्ये नूर आलम उर्फ आदिम खान, मो. सैफूल इस्लाम, सोहेल खान, जाकिर हवलादार आणि मो. सुमन हवलादार उर्फ पप्पू यांचा समावेश आहे. सहाव्या संशयितावर दिल्लीत एक वेगळा खटला सुरू असल्याने त्याला कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर गोव्यात आणले जाईल.

या टोळीची कार्यपद्धती अत्यंत क्रूर आणि शिस्तबद्ध होती. बांगलादेशातील बागेरहाट जिल्ह्याचे रहिवासी असलेले हे सर्वजण बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करत. शहरापासून लांब राहणारे श्रीमंत आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक त्यांच्या निशाण्यावर असत. दरोड्यादरम्यान प्रतिकार झाल्यास हत्या करण्यासही ही टोळी मागे-पुढे पाहत नसे. दरोडा टाकल्यानंतर हे गुन्हेगार थेट बांगलादेशात जाऊन लपून बसत.

गोव्यात या टोळीने प्रामुख्याने दोन मोठे दरोडे टाकले होते. २० एप्रिल २०२५ रोजी दोनापावला येथील एका बंगल्यात घुसून घरमालकांना बाथरूममध्ये कोंडून त्यांनी एक किलो सोने आणि ३ लाख रुपयांची लूट केली होती. त्यानंतर ७ ऑक्टोबर २०२५ रोजी म्हापसा हाऊसिंग बोर्ड परिसरात ३५ लाखांची लूट करून तक्रारदाराची कार घेऊन ते पसार झाले होते. याशिवाय फोंडा येथील चोरीच्या प्रकरणातही त्यांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.