स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष : परिसरात पुन्हा साथ पसरण्याची भीती

मडगाव : कुटबण येथील २२० मीटर लांबीच्या नवीन जेटीचे उद्घाटन होऊन दीड वर्ष उलटले तरी या भागातील परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर झाली आहे. ट्रॉलर मालकांनी जेटीवर मोठ्या प्रमाणात जाळी साठवून ठेवल्याने आणि माशांचे क्रेट्स टाकल्याने प्रत्यक्ष मासेमारीसाठी जागाच उरलेली नाही, असे स्थानिक मच्छीमारांकडून सांगण्यात आले.
या जेटीवर अस्वच्छतेचे मोठे साम्राज्य पसरले असून सांडपाणी, दारूच्या बाटल्या, जुने टायर आणि प्लास्टिक कचऱ्याचे ढीग सर्वत्र पाहायला मिळत आहेत. मागील अनुभवावरून धडा न घेता स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसते.

कुटबण जेटी परिसरात २०२४ मध्ये कॉलराची साथ पसरली होती, ज्यामध्ये पाच कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून जिल्हा प्रशासनामार्फत जेटीवरील अतिक्रमणे हटवली होती, मात्र दीड वर्षानंतर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

कामगारांच्या सोयीसाठी ऑगस्ट २०२५ मध्ये ६७ युनिट्सचा शौचालय आणि स्नानगृह प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असूनही स्वच्छतेचा प्रश्न सुटलेला नाही. अनेक कामगार या सुविधेचा वापर करण्याऐवजी ट्रॉलरवरच स्नान करणे पसंत करतात, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या सूचनांना केराची टोपली
मत्स्यव्यवसाय विभागाने जेटीचा गैरवापर करू नये म्हणून ट्रॉलर मालकांना कडक इशारे दिले होते. तरीही मासेमारीचा हंगाम सुरू असताना जेटीचा वापर केवळ साहित्य साठवण्यासाठीच केला जात असल्याने नवीन जेटीवर केवळ दोन बोटींसाठी जागा उपलब्ध आहे, परिणामी मच्छीमारांना जुन्या जेटीवर अवलंबून राहावे लागत आहे.