माजी मंत्री दीपक पाऊसकरसह इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल

विधानसभेत फलक झळकावल्याप्रकरणी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
19 mins ago
माजी मंत्री दीपक पाऊसकरसह इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल

म्हापसा : अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी विधानसभेच्या (Assembly)  प्रेक्षक गॅलरीतून मिराबाग येथील प्रस्तावित बंधार्‍याला विरोध करणार्‍या आंदोलकांनी फलक झळकावत घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला होता. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी माजी मंत्री दीपक पाऊसकर यांच्यासह पाचही संशयित आरोपींविरुद्ध ३०० पानी आरोपपत्र दाखल केले.

 गुरुवारी ३० रोजी सकाळी म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयात (JMFC, Court, Mapusa)  २१ साक्षीदारांच्या साक्षीसह ३०० पानी आरोपपत्र सादर केले. माजी मंत्री दीपक पाऊसकर यांच्या बरोबरच मिराबाग मधील आपा नाईक, उपेंद्र नाईक, उमेश नाईक व हेमंत भंडारी यांचा या संशयित आरोपींमध्ये समावेश आहे.

दरम्यान, ही घटना ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असलेल्या वरील चार संशयितांनी ‘आमका नाका बांध’, अशा आशयाचे फलक झळकावत सरकारविरोधात घोषणाबाजी केली होती. त्यानंतर चारही संशयितांना विधानसभा सुरक्षा कर्मचार्‍यांनी गॅलरीतून बाहेर काढत त्यांना ताब्यात घेतले होते. त्याच दिवशी आपा नाईक, उपेंद्र नाईक, उमेश नाईक व हेमंत भंडारी या चार जणांना १४४ कलमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली प्रतिबंधात्मक कारवाईखाली पोलिसांनी अटक केली होती.

 दुसऱ्या दिवशी ७ मार्च रोजी या संशयितांना बार्देश उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसमोर पोलिसांनी हजर केले. तेव्हा चालू विधानसभा अधिवेशन काळात विधानसभा तसेच पर्वरी परिसरात प्रवेशास मनाईच्या अटीसह प्रत्येकी २० हजार रूपये वैयक्तीक हमी रक्कमेच्या आधारे संशयितांची सुटका करण्यात आली.

 ७ मार्च रोजी पोलिसांनी गोवा विधानसभेच्या (Goa assembly) सचिव नम्रता उल्मान यांच्या तक्रारीच्या आधारे वरील संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद केला होता. विधानसभा सभागृहात विधानसभेचे सदस्य असलेले मंत्री आणि आमदार वगळता इतर कुणालाही कायद्यान्वये बोलण्यास आणि फलक झळकावण्यास बंदी आहे. तरीही वरील संशयितांनी फलक झळकावत घोषणाबाजी करत कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन करण्याचा गुन्हा केला आहे. त्यामुळे संबंधितांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती या तक्रारीत करण्यात आली होती.

त्यानुसार पर्वरी पोलिसांनी (Porvorim Police)  वरील चारही संशयितांविरूध्द भारतीय न्याय संहितेच्या ६१(२), ३२९(३), २२१(१) १३२ व ३५३(१) कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. तसेच संशयितांना कायदेशीर नोटीस बजावून संशयितांची पोलिसांनी चौकशी केली होती.

या तपासावेळी आंदोलक संशयितांना माजी मंत्री दीपक पाऊसकर यांनी विधानसभेचे प्रवेश पास हे आमदार विजय सरदेसाई यांच्या मार्फत मिळवून दिल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या प्रकरणात संशयित म्हणून पाऊसकर यांचा समावेश केला होता.

 प्रवेश पासचा हा प्रकार उघड झाल्यावर सभापती गणेश गावकर यांनी आमदार विजय सरदेसाई यांना नोटीस बजावली होती, त्यामुळे सरदेसाई यांनी विधानसभा सभागृहाची जाहीर माफी मागितली होती.

याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंदार परब यांनी तपास केला होता. तर विद्यमान पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा