काम शेवटच्या टप्प्यात; आज झाला हॉटमिक्सिंगच्या कामाचा शुभारंभ.

पणजी : गोव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुप्रतिक्षित असलेल्या पर्वरी इलिव्हेटेड कॉरिडोअरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नियोजित मुदतीपूर्वीच म्हणजेच गणेश चतुर्थीच्या आधी या कॉरिडोअरचे उद्घाटन करण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा पीडब्ल्यूडी मंत्री दिगंबर कामत यांनी केली आहे.

या निर्णयामुळे येथून कामानिमित्त प्रवास करणाऱ्या कामगार वर्गाला तसेच पर्यटकांना मोठा दिलासा मिळेल. आगामी गणेशोत्सवाच्या काळात बाप्पांचे आगमन आणि विसर्जन याच नवीन इलिव्हेटेड मार्गावरून होईल, अशीही माहिती त्यांनी दिली. आज हॉटमिक्सिंगच्या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे, साळगांवचे आमदार केदार नाईक तसेच प्रकल्पाशी निगडीत कंत्राटदार आणि अभियंते हजर होते.

वाहतूक कोंडीतून सुटका
पर्वरी हा भाग पणजी आणि उत्तर गोव्याला जोडणारा मुख्य महामार्ग असून, येथे नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पर्वरी जंक्शनवरील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी हा इलिव्हेटेड कॉरिडोअर उभारण्यात येत आहे. आता हा प्रकल्प वेळेआधीच पूर्ण होत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत होईल. प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचेल आणि प्रवासाचा अनुभव सुखकर होईल.

दिगंबर कामत यांनी घेतला आढावा
सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी या प्रकल्पाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता वेळेत काम पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदाराला कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
![]()
गोव्यात गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांवर भाविकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा वेळी पर्वरी इलिव्हेटेड कॉरिडोअर सुरू झाल्यामुळे वाहतूक कोंडी टळण्यास मोठी मदत होईल. स्थानिक नागरिक आणि भाविक या नवीन पुलावरून बाप्पाचे आगमन व विसर्जन अत्यंत आनंदात आणि वेळेत करू शकतील. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या घोषणेचे स्वागत केले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर गोव्याच्या पायाभूत सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाच्या घटकाची भर पडणार आहे.