गोव्यातील बार्देशमधील घटना

म्हापसा : माँते गिरी, बार्देश (Bardez) येथे हॉकी (Hockey) खेळताना घडलेल्या दुर्दैवी घटनेत १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा हृदयद्रावक प्रकार घडला. रुईशा खर्सेल (१४ वर्षे) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुईशा ही सेंट अॅंथनी माध्यमीक शाळेतील (School) मैदानावर आपल्या मैत्रिणींसोबत हॉकीचा सराव करत असताना अचानक बॉल (Ball) जोरात तिच्या डोक्यावर आदळला. या घटनेनंतर ती गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा इस्पीतळात (North Goa District Hospital) दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून; शाळा आणि स्थानिक क्रीडा वर्तुळात शोककळा पसरली आहे. रुईशा ही उत्साही व गुणी खेळाडू म्हणून ओळखली जात होती.
दरम्यान, क्रीडा सरावादरम्यान आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना पाळण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. याप्रकरणी साळगाव पोलीस (Saligao Police) अधिक तपास करीत आहेत.