ज्यादा परताव्याच्या आमिषाला बळी पडून अनधिकृत योजनेत गुंतवणूक करू नका

मुख्यमंत्री डॉ. सावंतांचा सल्ला

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
20 mins ago
ज्यादा परताव्याच्या आमिषाला बळी पडून अनधिकृत योजनेत गुंतवणूक करू नका

पणजी: गेल्या सात वर्षांत राज्यात ५०० ते १००० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नागरिकांनी जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडून कोणत्याही अनधिकृत योजनेत गुंतवणूक करू नये, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. फसवणूक झाल्यानंतर सरकारला दोष देण्यापेक्षा नागरिकांनी सुरुवातीलाच जागरूक राहणे काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.

पणजी येथील मेनेजेस ब्रॅगांझा सभागृहात ‘फ्युचर वेल्थ गोवा परिषद २०२६’ च्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (जीसीसीआय) अध्यक्षा प्रतिमा धोंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लोकांचे पैसे दुप्पट करण्याचे किंवा दरमहा ६ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून अनेक जणांना फसवण्यात आले आहे. अशा प्रकरणांमधील गुन्हेगार लंडन, दुबई आणि इतर राज्यांत पळून गेले आहेत. गोमंतकीयांकडे भरपूर पैसा आहे, पण तो चुकीच्या ठिकाणी गुंतवल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील सात वर्षांत ५० हजार रुपयांपासून ते ५ कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

फसवणूक झाल्यानंतर लोक सरकारवर टीका करतात, परंतु गुंतवणूक करताना सरकारला कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नाही. जर सुरुवातीलाच याबाबत तक्रार केली असती, तर वेळीच कायदेशीर कारवाई करणे शक्य झाले असते. क्रिप्टो आणि फॉरेक्सच्या नावाखाली लोकांची फसवणूक झाली असून, गोमंतकीयांनी अशा आमिषांना बळी न पडता सतर्क राहावे आणि गरज नसताना कोणत्याही फंडात गुंतवणूक करू नये, असा स्पष्ट सल्ला त्यांनी दिला.

तरुणांना आणि नागरिकांना आर्थिक साक्षर करण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पदवी स्तरावर विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षर करण्याचे नियोजन असून, त्यासाठी प्रथम शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर पदवी स्तरावर हा उपक्रम सुरू करून टप्प्याटप्प्याने तो शालेय स्तरावर नेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यामुळे भविष्यात अशा आर्थिक फसवणुकीचे प्रकार थांबतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील बँकिंग व्यवस्थेची आकडेवारी देताना मुख्यमंत्री म्हणाले की, १५ लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात ८०७ बँक शाखा कार्यरत आहेत. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत २.६ लाख सामान्य बँक खाती उघडण्यात आली असून, त्यामध्ये ११92 कोटी रुपये जमा आहेत. विविध बँकांनी गावागावांत ९६६ आर्थिक साक्षरता शिबिरे आयोजित केली आहेत. नागरिकांनी या सुविधांचा योग्य वापर करून आर्थिक व्यवहारांमध्ये सतर्क राहावे.


हेही वाचा