महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग वाढतोय

नवी दिल्ली : भारतात पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (Indian Council of Medical Research - ICMR) ताज्या अभ्यासातून समोर आले आहे. तंबाखूचे वाढते सेवन हे या वाढीमागील प्रमुख कारण असल्याचेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
आयसीएमआर (ICMR) अंतर्गत आयसीएमआर-नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ नॉन-कॉम्युनिकेबल डिसिज इपीडेमीओलोजी ( ICMR-National Institute of Non-communicable Disease Epidemiology (ICMR-NINE)) यांनी ग्लोबल कॅन्सर ऑब्झरवेटरी २०२२च्या आकडेवारीच्या आधारे ११ देशांतील कर्करोगाच्या प्रवृत्तीचे विश्लेषण केले. त्यात भारतासह अनेक जी२० देशांमध्ये पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अभ्यासानुसार भारतात पुरुषांमधील तोंडाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये दरवर्षी सुमारे १.२० टक्के वाढ होत आहे. चीन, कॅनडा आणि अमेरिकेतही वाढीचा कल दिसून आला आहे. आयसीएमआर-नाईनचे संचालक डॉ. प्रशांत माथुर यांनी सांगितले की, गुटखा, पान, खैनी यांसारख्या धूम्ररहित तंबाखूचे सेवन, मद्यपान आणि सुपारी चघळण्याची सवय ही या कर्करोगाची मुख्य कारणे आहेत.
भारतात उशीरा निदान
अभ्यासात असेही आढळले की; भारतातील बहुतेक रुग्णांमध्ये या कर्करोग उशीरा निदान होते. त्यामुळे उपचार अधिक गुंतागुंतीचे आणि खर्चिक ठरतात. त्यामुळे लवकर निदानावर भर देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.
महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग वाढतोय
महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वाधिक आढळणारा कर्करोग असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये दरवर्षी १.८३ टक्के वाढ होत आहे. दुसरीकडे, गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये भारतात दरवर्षी सुमारे ४.१९ टक्क्यांनी घट होत असून, सुधारित तपासणी आणि एचपीव्ही लसीकरणामुळे ही घट कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
भारतात २०२४ मध्ये ८.७४ लाख मृत्यू
जागतिक स्तरावर कर्करोग हा गंभीर आरोग्यविषयक आव्हान बनला असून, २०२४ मध्ये भारतात १५.६ लाख नवीन रुग्ण आणि ८.७४ लाख मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्याची प्रवृत्ती कायम राहिल्यास २०४५ पर्यंत दरवर्षी २४.६ लाखांहून अधिक रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, २०२४ मध्ये पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे १.१३ लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जनजागृती, लवकर निदानाची गरज
तज्ज्ञांच्या मते, तंबाखूविरोधी जनजागृती, लवकर निदान आणि आरोग्य सुविधा बळकट केल्यास कर्करोगाचा वाढता भार नियंत्रणात आणता येऊ शकतो.