सुट्टयांमुळे गोवा-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या भल्यामोठ्या रांगा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
46 mins ago
सुट्टयांमुळे गोवा-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडल्याने गोवा-मुंबई महामार्गावर (Goa-Mumbai Highway) मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. कोकणात (Konkan)  जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नागोठणे जवळ कोकणाकडे जात असलेल्या मार्गावर वाहने कोंडीत अडकली. त्यामुळे वाहनांची मोठी रांग लागली.

वाकण फाटा ते कामत हॉटेल दरम्यान अनेक किलोमीटरपर्यंत वाहने अडकून पडली आहेत. वाहनांची गती अत्यंत धिमी झाली आहे. काही ठिकाणी तर वाहनांना पुढे जाण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आणि महाराष्ट्र दिनमुळे (Maharashtra Day)  मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणाच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे अचानक वाहनांची संख्या महामार्गावर वाढली आहे. महार्गावरील अर्धवट कामामुळे वाहतुकीचा वेग कमी झाला आहे.

त्यातच वाहनचालकांकडून केले जाणारे नियमांचे उल्लंघन, बेशिस्त पार्किंग, ओव्हरटेकिंगमुळे वाहन कोंडीत अधिक भर पडत आहे. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असले तरी; वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे समस्या निर्माण होत आहेत.

गर्दीच्या वेळेत प्रवास टाळावा 

दरम्यान, वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. गर्दीच्या वेळेत प्रवास टाळणे, वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करणे व कोकणात जात असलेल्या प्रवाशांनी पुरेसा वेळ हातात ठेवून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सलग सुट्ट्या असल्याने पुढील काही दिवस अशीच कोंडी कायम राहण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा