एमपीमधील जबलपूरच्या बरगी धरणात क्रूझ उलटून नऊ पर्यटकांचा मृत्यू; २२ जणांना वाचवण्यात यश

धरणाच्या पाण्यात अचानक निर्माण झालेल्या वादळामुळे क्रूझ उलटली, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
21 mins ago
एमपीमधील जबलपूरच्या बरगी धरणात क्रूझ उलटून नऊ पर्यटकांचा मृत्यू; २२ जणांना वाचवण्यात यश

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बरगी धरणात गुरुवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. पाण्यात अचानक तयार झालेल्या तीव्र वादळामुळे पर्यटकांनी भरलेली एक क्रूझ उलटली व २० फूट खोल पाण्यात बुडाली. या भीषण अपघातात आतापर्यंत नऊ जणांचे मृतदेह हाती लागले असून १५ हून अधिक पर्यटक अद्याप बेपत्ता आहेत. सुदैवाने २२ पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मृतांमध्ये प्रामुख्याने दिल्ली आणि तामिळनाडू येथील महिला पर्यटकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण जबलपूर परिसरात शोककळा पसरली असून प्रशासकीय यंत्रणांनी बचावकार्य अधिक तीव्र केले आहे.


बरगी डैम पर बड़ी संख्या में लोग पहुंचे हैं।


मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी पर्यटन विभागाची ही क्रूझ सुमारे ४० ते ४५ पर्यटकांना घेऊन बरगी धरणाच्या सफारीसाठी निघाली होती. काठापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर असताना अचानक वातावरणात बदल झाला आणि जोरदार वाऱ्यासह वादळ सुरू झाले. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, क्रूझमधील पर्यटकांनी चालकाला क्रूझ काठावर नेण्याची विनंती केली होती, मात्र कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की क्रूझ अनियंत्रित होऊन पाण्यात कलंडली. धक्कादायक बाब म्हणजे क्रूझवर सवार असलेल्या अनेक पर्यटकांनी लाईफ जॅकेट घातले नव्हते. ऐनवेळी कर्मचाऱ्यांनी जॅकेट देण्याचा प्रयत्न केला, परंतु अत्यंत वेगाने आलेल्या वादळामुळे कोणालाही ते घालण्याची संधी मिळाली नाही. तसेच, या क्रूझवर ११ पर्यटक विनातिकीट प्रवास करत होते. यामुळे प्रवाशांची नेमकी संख्या निश्चित करण्यात अडथळे येत आहेत.

या दुर्घटनेत ऑर्डिनन्स फॅक्टरी खमरिया येथील कर्मचारी कामराज आर्य यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. कामराज त्यांच्या पत्नी, मुले आणि तामिळनाडूवरून आलेल्या पाहुण्यांसह क्रूझमध्ये गेले होते. त्यांचे वृद्ध आई-वडील काठावर बसलेले असल्याने ते बचावले, मात्र त्यांच्या डोळ्यांदेखत अख्खे कुटुंब पाण्यात बुडाले. कामराज यांचा एक मुलगा वाचला असून ते स्वतः, त्यांची पत्नी आणि एक मुलगा अद्याप बेपत्ता आहेत. दुसरीकडे, जबलपूरचे सोनी कुटुंब या मृत्यूच्या तावडीतून सुदैवाने थोडक्यात बचावले आहे.


अंधेरा होने के कारण रेस्क्यू टीम को परेशानी भी आई।


धरण क्षेत्रात पाणी आणि चिखल जास्त असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. या दुर्घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक प्रशासनासह आता भारतीय लष्करानेही मोर्चा सांभाळला आहे. हैदराबाद येथून विशेष पथक आणि हेलिकॉप्टर पाचारण करण्यात आले आहे, तर कोलकाता येथील निमलष्करी दलाची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. सुमारे २० फूट खोल पाण्यात अडकलेली क्रूझ बाहेर काढण्यासाठी पोकलेन आणि हायड्रोलिक यंत्रांचा वापर केला जात आहे. पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही क्रूझ २००६ मध्ये बनवण्यात आली होती आणि तिची क्षमता ६० प्रवाशांची होती. मात्र, तांत्रिक बिघाड किंवा मानवी चुकांमुळे ही दुर्घटना घडली का, याचा तपास आता सुरू झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून बेपत्ता नागरिकांच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा