आधार बायोमेट्रिक फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक

अहमदाबाद : गुगलच्या 'जेमिनी एआय' प्रणालीचा वापर करून लोकांचे डोळे मिचकावणारे 'डीपफेक' व्हिडिओ तयार करून बँकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अहमदाबाद सायबर क्राईम युनिटने अटक केली आहे. या कारवाईत एकूण चार संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे.
या टोळीची कार्यपद्धती अत्यंत आधुनिक आणि धक्कादायक होती. हे संशयित सुरुवातीला पीडित व्यक्तीचा आधार क्रमांक आणि फोटो मिळवायचे. त्यानंतर जेमिनी किंवा मेटा एआयसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून त्या व्यक्तीचा असा व्हिडिओ बनवायचे, ज्यामध्ये ती व्यक्ती डोळे मिचकावताना दिसेल. आधारची 'फेस ऑथेंटिकेशन' प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिवंत व्यक्तीची हालचाल आवश्यक असते; संशयितांनी स्क्रीनवर हे डीपफेक व्हिडिओ दाखवून आधार प्रणालीला हुलकावणी दिली. याद्वारे त्यांनी आधारला लिंक असलेला मूळ मोबाईल क्रमांक बदलून स्वतःचा क्रमांक नोंदवला. एकदा मोबाईल क्रमांक बदलला की, सर्व ओटीपी संशयितांच्या फोनवर येऊ लागले, ज्यामुळे त्यांना डिजीलॉकर आणि बँक खात्यांचे पूर्ण नियंत्रण मिळाले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये कनु परमार, आशिष वालंद, मोहम्मद कैफ पटेल आणि दीप गुप्ता यांचा समावेश आहे. यातील कैफ पटेल हा तांत्रिक बाजू सांभाळत असे, तर दीप गुप्ता डेटा पुरवठा करायचा. संशयितांनी या चोरीच्या ओळखीचा वापर करून कोटक महिंद्रा, आयडीएफसी आणि जिओ पेमेंट्स बँक यांसारख्या बँकांमध्ये खाती उघडली आणि लोकांच्या नावे लाखो रुपयांची वैयक्तिक कर्जेही उचलली. थाल्तेज येथील एका व्यक्तीच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये संशयास्पद कर्जे दिसल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आपले आधार बायोमेट्रिक सुरक्षित ठेवण्यासाठी 'mAadhaar' ॲप किंवा यूआयडीएआयच्या (UIDAI) अधिकृत वेबसाइटवरून बायोमेट्रिक लॉक करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, अनोळखी व्यक्तींना ओटीपी शेअर करू नये आणि शक्य असल्यास 'मास्क्ड आधार'चा वापर करावा, असा सल्ला सायबर तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या हे चारही संशयित न्यायालयीन कोठडीत असून पोलीस या टोळीच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.