इंडोनेशियामध्ये डे-केअर सेंटरमध्ये चिमुरड्यांचा अमानुष छळ

५३ बालकांना बांधून ठेवल्याचा प्रकार उघड

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
15 mins ago
इंडोनेशियामध्ये डे-केअर सेंटरमध्ये चिमुरड्यांचा अमानुष छळ

इंडोनेशिया : इंडोनेशियातील योज्यकर्ता (Yogyakarta) शहरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका खासगी डे-केअर सेंटरमध्ये लहान मुलांचा अमानुष छळ केला जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जगभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 'लिटल अरेषा' (Little Aresha) डे-केअर सेंटरच्या प्रमुखासह १३ जणांना अटक केली आहे.

योज्यकर्ता येथील 'लिटल अरेषा' या डे-केअर सेंटरमध्ये मुलांची काळजी घेण्याऐवजी त्यांचा छळ केला जात असल्याची तक्रार एका माजी कर्मचाऱ्याने केली होती.  सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ अंगावर शहारे आणणारे आहेत. यामध्ये दोन वर्षांखालील चिमुरड्यांचे हात-पाय कापडाच्या पट्ट्यांनी बांधून त्यांना जमिनीवर झोपवल्याचे दिसत आहे. काही मुले रडत होती, तर काही तासनतास भुकेलेली आणि अस्वच्छ अवस्थेत एकाच जागी पडून होती.

पोलिस तपासात समोर आले आहे की, या डे-केअर सेंटरमध्ये एकूण १०३ मुले नोंदणीकृत होती. त्यापैकी किमान ५३ बालकांचा, ज्यांचे वय दोन वर्षांपेक्षा कमी आहे.  अवघ्या ३ बाय ३ मीटरच्या लहान खोल्यांमध्ये २०-२० मुलांना कोंबून ठेवले जात होते. सर्वात धक्कादायक म्हणजे, हे डे-केअर सेंटर विनापरवाना चालवले जात होते.

योज्यकर्ता मेट्रो पोलिस प्रमुखांनी माहिती दिली की, अटक केलेल्या १३ संशयितांमध्ये फाऊंडेशनचा प्रमुख, केंद्राचा व्यवस्थापक आणि ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संशयितांनी पोलिसांना सांगितले की, मुले जास्त हालचाल करू नयेत किंवा इतरांना त्रास देऊ नये म्हणून त्यांना बांधून ठेवले जात होते. मात्र, पोलिसांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला आहे. स्थानिक नगरसेवकांनी या घटनेला 'विलक्षण गुन्हा' (Extraordinary Crime) संबोधले असून, इंडोनेशियाच्या बाल संरक्षण कायद्यानुसार दोषींना 'गोळ्या झाडून मृत्यू' (Death by firing squad) अशी कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

एअर-कंडिशन्ड रूम, चांगले जेवण आणि खेळाच्या सुविधा पाहून आम्ही आमच्या मुलाला येथे ठेवले होते. पण ब्रँडिंगच्या नावाखाली आमच्या मुलांसोबत इतकी क्रूरता केली जाईल, असे वाटले नव्हते, अशा भावना एका पीडित पित्याने व्यक्त केल्या. अनेक पालकांनी सांगितले की, मुलांच्या अंगावर जखमा दिसल्यावर केंद्राकडून 'खेळताना लागलं असेल' असे सांगून दिशाभूल केली जात होती.

या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरातून संताप व्यक्त होत आहे. नेटिझन्सनी याला 'अमानवी'  कृत्य म्हटले आहे. सध्या पीडित मुलांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. या घटनेने इंडोनेशियातील डे-केअर केंद्रांच्या नियमन आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा