
पणजीः उच्च शिक्षण संचालनालयाने २०२६-२०२८ वर्षासाठी बी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. गोव्यातील तीन शिक्षण महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सामान्य ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार, अशी माहिती उच्च शिक्षण संचालनालयाने जारी केली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२०२८ साठी निर्मला शिक्षण संस्था, पणजी, जीव्हीएम कॉलेज ऑफ एज्युकेशन फोंडा आणि पीईएस कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे बी.एड. (Bachelor of Education (B.Ed.)) अभ्यासक्रमासाठी सामान्य ऑनलाईन (Online) प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. नमूद केलेल्या सर्व संस्थांनी सामान्य प्रवेश प्रक्रियेसाठी समन्वय केंद्रे असणार आहेत.
सामान्य बी.एड. प्रोस्पेक्ट्सची सॉफ्ट कॉपी डीएचईच्या (DHE) उच्च शिक्षण संचालनालयाच्या (Directorate of Higher Education, Goa) वेबसाईटवर (Website) विनामू्ल्य उपलब्ध आहे. गोवा विद्यापीठाच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या ‘जीयू-एआरटी' परिक्षेत वैध रॅंक मिळालेले इच्छुक उमेदवार प्रवेशासाठी संचालनालयाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.
प्रवेश पोर्टल ३० एप्रिल २०२६ या दिवशी सकाळी ११ ते ११ मे २०२६ पर्यंत चालू राहणार आहे. अर्जदारांनी प्रोस्पेक्ट्समध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली वैध कागदपत्रे अपलोड करावीत. गुणवत्ता यादी आणि समुपदेशनाच्या तारखांच्या माहितीसाठी अर्जदारांनी डीएचईच्या वेबसाईटला भेट द्यावी.
प्रवेश प्रक्रियेसंदर्भात काही संशय असल्यास किंवा माहिती हवी असल्यास 0832- 2415585 वा 2410824 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. उमेदवारांना विनंती आहे की, त्यांनी अर्ज फॉर्मची हार्ड कॉपी जमा करण्यासाठी कार्यालयात येवू नये.