कळंगुट वाहतूक सेलचा वीज पुरवठा पूर्ववत

वीज बिल भरण्याची अट : जागा रिकामी करत नसल्याने पंचायतीकडून वीज खंडित

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th April, 11:15 pm
कळंगुट वाहतूक सेलचा वीज पुरवठा पूर्ववत

म्हापसा : कळंगुट ग्रामपंचायत (Calangute panchayat) आणि वाहतूक पोलीस सेल (traffic police cell) यांच्यात पोरीएट मैदानाची जागा रिकामी करण्यावर गेली तीन वर्षे सुरू असलेला वाद वीज पुरवठा खंडित (power cut) करण्यापर्यंत गेला. स्थानिक आमदाराने या प्रकरणात मध्यस्थी केल्यानंतर पंचायतीकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

तिवायवाडा-कळंगुट येथील ग्रामपंचायतीच्या पोरीएट फुटबॉल मैदान इमारतीमध्ये २०१२ पासून कळंगुट वाहतूक पोलीस सेल कार्यरत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या विनंतीनुसार पंचायतीने वाहतूक पोलीस सेलला या मैदान इमारतीची चेंजिंग रूमची खोली दिली होती. त्यावेळी पंचायतीने पोलीस खात्यासोबत कोणत्याही प्रकारचे भाडेकरू करारपत्र केले नव्हते व विनाशुल्क ही जागा सरकारला वाहतूक पोलीस सेलसाठी उपलब्ध करून दिली होती.

त्यानंतर ही जागा रिकामी करावी किंवा मासिक वीज बिलाचा भरणा करावा, अशी विनंती पंचायतीने या सेलच्या पोलीस निरीक्षकांकडे केली होती. शिवाय गेल्या फेब्रुवारी २०२३ मध्ये कळंगुट पोलीस स्थानकाच्या इमारतीमध्ये कार्यरत असलेले साळगाव पोलीस स्थानक स्थलांतरित झाल्यामुळे सदर रिकाम्या जागी वाहतूक पोलीस सेलचे स्थलांतर करावे व मैदानाची जागा रिकामी करावी, अशी विनंती पंचायत मंडळाच्या ठरावाद्वारे पंचायतीने वाहतूक पोलीस विभागाला पत्राद्वारे केली होती.

वाहतूक पोलीस विभागाला गेली तीन वर्षे याबाबतीत स्मरणपत्रे पाठवूनही कोणताही प्रतिसाद मिळत नाही. शिवाय जर जागा रिकामी करत नसल्यास गेल्या १४ वर्षांची १६ लाख रुपये वीज बिलाच्या रकमेपैकी निम्मी ८ लाख रुपये रक्कम जमा करावी, अशी विनंती पंचायतीने केली. या विनंतीपत्रालाही प्रतिसाद मिळाला नसल्याने शेवटी २२ एप्रिल रोजी पंचायतीकडून वाहतूक पोलीस सेलचा वीजपुरवठा कापण्याची कारवाई केली होती. त्यामुळे वाहतूक सेलचे कामकाज वीज पुरवठ्याअभावी हाताळण्याची वेळ पोलीस निरीक्षक ब्रँडन डिसोझा व सहकारी कर्मचाऱ्यांवर आली होती.

या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार मायकल लोबो यांनी पाच दिवसांनी मंगळवारी सरपंचांसमवेत संयुक्त बैठक घेतली. वीज बिलाची थकित रक्कम तसेच मैदानाची जागा रिकामी करण्याचा मुद्दा पोलीस खात्याकडे मांडून हा विषय निकाली काढू, तोपर्यंत वाहतूक सेलचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याची विनंती लोबो यांनी सरपंच जोजफ सिक्वेरा व पंचायत मंडळाकडे केली. या आश्वासनानंतर पंचायतीने सांयकाळी वीज पुरवठा पूर्ववत केला.

कळंगुट पंचायतीच्या पोरीएट फुटबॉल मैदानावर २०१२ पासून वाहतूक पोलीस सेल कार्यरत आहे. या सेलच्या वीज बिलाचा खर्च १६ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. आम्ही या सेलला किमान निम्मी रक्कम म्हणजे ८ लाख रुपये भरण्याची विनंती केली होती. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने आम्हाला वीज पुरवठा बंद करावी लागला. आता आमदारांनी पोलीस मुख्यालयाशी बोलून थकित बिलाच्या रकमेची भरणा करून किंवा आपण स्वत:हून ही रक्कम जमा करू, असे आश्वासन दिल्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत केला आहे.
- जोजफ सिक्वेरा, सरपंच 
हेही वाचा