२७६ जणांना ९० टक्क्यांहून अधिक गुण : ४० टक्क्यांहून कमी गुण मिळवणारे ८४७ विद्यार्थी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : यंदा दहावीचा निकाल ९४.५१ टक्के लागला असला तरी सर्वाधिक विद्यार्थ्यांना ५० ते ६० टक्के या दरम्यान गुण मिळाले आहे. उत्तीर्ण झालेल्या १९,४८६ विद्यार्थ्यांपैकी ४,७३९ विद्यार्थ्यांना ५० ते ६० टक्के दरम्यान गुण प्राप्त झाले आहेत. ६० ते ७० टक्के दरम्यान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४,६४३ आहे.
शालान्त मंडळाच्या निकालाच्या विश्लेषणातून ही माहिती मिळाली आहे. मागील काही वर्षे निकाल ९० टक्क्यांहून अधिक लागत आहे. पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असली तरी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत आहे, असे म्हणता येत नाही. अधिक विद्यार्थी पास झाले तर निकालाची टक्केवारी वाढते. विद्यालय, केंद्र वा राज्याच्या निकालाविषयी असेच आहे. क्रीडा गुण आणि नव्या कॉम्पेसेटरी योजनेमुळे पास होणे आता सोपे झाले आहे. याचा परिणाम निकालाची टक्केवारी वाढण्यावर होत आहे.
गुणांचा विचार केला असता ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश हुशार विद्याथर्यांमध्ये केला जातो. यंदा ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या फक्त २७६ आहे. याचा अर्थ पास झालेल्या १९,४८६ विद्यार्थ्यांमध्ये २७६ विद्यार्थी हे सर्वांत हुशार आहेत.
८० ते ९० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १,८४८ आहे. त्यानंतर ७० ते ८० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी ३,६५९ आहेत. ६० ते ७० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी ४,६२३ आहेत. ५० ते ६० टक्के गुण मिळवणारे ४,७३९, तर ४० ते ५० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी ३,८६० आहेत. ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणारे ८४७ विद्यार्थी आहेत. ८४७ हा आकडा नगण्य म्हणता येणार नाही. पास झालेल्या ७५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. ही समाधानाची गोष्ट आहे.
धेंपे, चौगुले, सेंट झेवियर यासारख्या शहरातील उच्च माध्यमिक विद्यालयांत आकरावीसाठी मर्यादित जागा असल्यने कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सुप्रसिद्ध उच्च माध्यमिक विद्यालयांत प्रवेश मिळणे कठीण होते.