मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्र सरकारचे आभार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा सरकारने केंद्राकडे केलेल्या मागणीला यश आले असून बंगळुरू-मडगाव मार्गावर ‘वंदे भारत’ एक्सप्रेस सुरू करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या रेल्वेमुळे पर्यटनच नव्हे, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आश्वासन पूर्ण केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे विशेष आभार मानले.
केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी गोवा सरकारने केंद्राकडे मागण्यांचे निवेदन सादर केले होते. यामध्ये गोव्यासाठी ‘वंदे भारत’ रेल्वे सुरू करण्याच्या मागणीचा समावेश होता. ही मागणी केंद्र सरकारने मान्य केल्यामुळे गोव्याच्या दळणवळण क्षेत्रात मोठी भर पडली आहे.‘वंदे भारत’ रेल्वेमुळे प्रवासाच्या वेळेत सरासरी ४५ टक्के बचत होते. आतापर्यंत देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या १६२ ‘वंदे भारत’ रेल्वे सुरू झाल्या असून, त्या मालिकेत आता बंगळुरू-मडगाव या महत्त्वपूर्ण मार्गाची भर पडली आहे.

नवीन रेल्वे सुविधेचा सर्वाधिक फायदा गोव्यातील तरुणांना होईल. गोव्यातील अनेक तरुण बंगळुरूमध्ये आयटी आणि इतर उद्योगांमध्ये कार्यरत आहेत. उच्च शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी बंगळुरूमध्ये वास्तव्यास आहेत. या वेगवान रेल्वेमुळे व्यापारी आणि पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन राज्याला पुरक वातावरण मिळेल.
_ डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री