माधव खट्टरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

जामीन अर्जावर आज सुनावणी


27th April, 11:36 pm
माधव खट्टरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : वास्को येथील सार्वजनिक कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल संशयित गौतम खट्टर याने आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण केला होता. या प्रकरणी गौतम खट्टरचा भाऊ माधव खट्टर याला वास्को प्रथमवर्ग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबतचा आदेश न्या. पूजा देसाई यांनी दिला. दरम्यान, माधव खट्टरने जामीन अर्ज दाखल केला असून मंगळवारी त्यावर सुनावणी होणार आहे.
गौतमचा भाऊ माधव खट्टरनेच आयोजकांशी समन्वय साधून कार्यक्रमाचे नियोजन केले होते. आक्षेपार्ह भाषणही त्यानेच लिहून दिले होते. त्याने गौतमसाठी आयोजकांकडून ५१ हजार रुपये आणि लॉजिस्टिक व्यवस्था घेतली होती, अशी माहिती समोर आल्यानंतर माधवला सहसंशयित करण्यात आले. त्याला हरिद्वार येथून अटक करून गोव्यात आणण्यात आले होते. गुरुवारी माधवला वास्को न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. रविवारी कोठडी समाप्त झाल्यानंतर त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, माधवने जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर मंगळवार, २८ रोजी सुनावणी होणार आहे.
गौतम खट्टर पोलीस कोठडीत
मुख्य संशयित गौतम खट्टर याला हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातून अटक केल्यानंतर रविवारी गोव्यात आणले. गुन्हा शाखेने त्याला वास्को येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.