बागा-कळंगुट येथे दुचाकींच्या टक्करीत दोघा युवकांचा मृत्यू

दोघे जखमी : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल


43 mins ago
बागा-कळंगुट येथे दुचाकींच्या टक्करीत दोघा युवकांचा मृत्यू


प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : बागा-कळंगुट येथे दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात मूळ गुजरात मधील अनिल उग्रेजिया (२७, रा. कांदोळी) व अरुण गोडीचा (२६, रा. गिरी) या दोघा युवकांचा मृत्यू झाला. ठाणे मुंबईतील शशांक जाधव (३६) व श्रीजी नायर (३३) हे जखमी झाले असून अपघातास कारणीभूत दुचाकीचालक शशांक यांच्याविरुद्ध कळंगुट पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.


अनिल उग्रेजिया
हा अपघात रविवारी पहाटे ५.१५ च्या सुमारास बागा येथील रॉनिल हॉटेलजवळ घडला. अरुण गोडीचा आणि अनिल उग्रेजिया दुचाकीवरून (क्र. जीए ०३ एक्यू ६६०२) कळंगुटहून बागाकडे जात होते. जाधव व नायर स्कूटरवरून (क्र. जीए ०७ एजे ३८७२) बागाहून कळंगुटकडे जात होते. घटनास्थळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात दुचाकीवरील चौघेही जखमी झाले. गंभीर जखमी अनिल याला पोलीस रॉबर्ट जीपमधून कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अन्य जखमींना रुग्णवाहिकेतून गोमेकॉत दाखल करण्यात आले. अरुण याचा दुपारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शशांक व श्रीजी यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.


अरुण गोडीचा.
कळंगुट पोलीस उपनिरीक्षक स्नेहल मळीक व साहाय्यक उपनिरीक्षक रवी गावस यांनी अपघाताचा पंचनामा केला. अपघातास कारणीभूत दुचाकीचालक शशांक जाधव याच्याविरुद्ध भा. न्या. सं. व मोटार वाहन कायद्यान्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.