भगीरथ शेट्ये : क्रीडा गुणांमुळे ६७ विद्यार्थी उत्तीर्ण

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : एखाद्या विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत दोन मुख्य विषयांत फक्त १० टक्के गुण मिळाल्यास कॉम्पेसेशन योजनेखाली त्याला पास करण्याची योजना यावर्षीपासून सुरू झाली आहे. यंदा ३४२ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. कॉम्पेसेशेन योजनेमुळे ते पास झाले. क्रीडा गुणांचा ६७ विद्यार्थ्यांना लाभ झाला, अशी माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.
शालान्त मंडळाने रविवारी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. या योजनेमुळे यंदा दहावीच्या निकालाची टक्केवारी ९० टक्क्यांहून अधिक झाली. यावर्षीपासून ग्रेस मार्क देण्याची पद्धत बंद होऊन नवी कॉम्पेसेशेन योजना सुरू झाली आहे. त्यामुळे ८० गुणांच्या परीक्षेत ८, तर ७० गुणांच्या परीक्षेत ७ गुण पडणे आवश्यक आहे. यापूूर्वी
८० गुणांच्या परीक्षेत १७, तर ७० गुणांच्या परीक्षेत १५ गुण पडणे आवश्यक होते. आता काॅम्पेसेशन योजनेसाठी दोन विषयांत १० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थी पास होत असेल तरच त्याला या योजनेचा लाभ दिला जातो.
गोव्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (एनईपी) कार्यवाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शालान्त मंडळाने दहावी परीक्षेसाठी नवी योजना लागू केली आहे. ही योजना फक्त मुख्य ६ विषयांना लागू होते. कौशल्य आधारित विषय वा विद्यालयीन मूल्यमापन विषयांसाठी ही योजना नाही. यंदा दहावीत तीन भाषा (इंग्रजी, हिंदी, मराठी/कोंकणी) आणि समाजशास्त्र (सोशल सायन्स), विज्ञान (सायन्स) आणि गणित (मॅथेमॅटिक्स) हे ६ मुख्य विषय होते. यापैकी जे विद्यार्थी दोन विषयांत नापास झाले, ते कॉम्पेसेशेन योजनेद्वारे पास झाले आहेत.
काय आहे कॉम्पेन्सेशन योजना ?
इंग्रजी, हिंदी, मराठी/कोंकणी, समाजशास्त्र आणि गणित या विषयांचे पेपर ८० गुणांचे आहेत. या विषयांत १० टक्के म्हणजे कमीतकमी ८ गुण मिळाले पाहिजे.
विज्ञानाचा पेपर ७० गुणांचा आहे. या विषयात कमीतकमी ७ गुण मिळाले पाहिजेत.
संबंधित विषयांत ८ वा ७ पेक्षा कमी गुण मिळाल्यास काॅम्पेसेशन योजनेचा लाभ मिळत नाही.
या योजनेसाठी १० टक्के गुणांसह जे अन्य चार कौशल्याधारित विषय आहेत, त्यापैकी दोन विषयांत ६५ टक्के आणि अन्य दोन विषयांत ५० टक्के गुण मिळणे गरजेचे आहे.
प्रात्यक्षिक परीक्षेलाही ही योजना लागू आहे. विज्ञानात २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा आहे. यापैकी १० टक्के म्हणजे २ गुण मिळाले तरी कॉम्पेसेशन योजनेचा लाभ मिळतो.