जगातील १०० अतिउष्ण शहरांपैकी तब्बल ९५ शहरे भारतात

जागतिक तापमानाचे हादरवणारे चित्र : अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
26th April, 11:52 pm
जगातील १०० अतिउष्ण शहरांपैकी तब्बल ९५ शहरे भारतात

नवी दिल्ली : जागतिक तापमानासंदर्भातील (global warming) ताज्या आकडेवारीनुसार, भारत (India) जागतिक उष्णतेच्या लाटेच्या केंद्रस्थानी आहे. जगातील १०० सर्वांत उष्ण शहरांपैकी (world's hottest cities) तब्बल ९५ शहरे भारतातील आहेत.

‘एक्यूआयडॉटइन’ (https://www.aqi.in/) या संकेतस्थळाने २४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता घेतलेल्या आकडेवारीतून उपखंडाच्या मोठ्या भागाला विळखा घातलेल्या सध्याच्या उष्णतेच्या लाटेची तीव्रता आणि व्याप्ती अधोरेखित करते. मध्य भारतापासून ते इंडो-गंगेच्या मैदानी प्रदेशापर्यंत, अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे, तर अनेक ठिकाणी ते ४५ अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे.

या यादीत केवळ प्रमुख शहरी केंद्रांचाच नव्हे, तर लहान शहरांचाही समावेश आहे, जे उष्णतेची लाट किती व्यापक आणि गंभीर झाली आहे हे दर्शवते. महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओडिशा यांसारखी राज्ये सर्वाधिक उष्ण आहेत. या प्रत्येक प्रदेशातील अनेक शहरे सर्वांत उष्ण १०० शहरांमध्ये ठळकपणे दिसतात.

आणखी काही दिवस उष्णता राहणार कायम...

हवामानशास्त्रज्ञ या तापमानवाढीमागे अनेक घटकांचे मिश्रण असल्याचे सांगतात, ज्यात सतत वाहणारे कोरडे वारे, निरभ्र आकाश आणि मान्सूनपूर्व हालचालींना झालेला विलंब यांचा समावेश आहे. पुरेशा पावसाचा अभाव आणि ढगाळ वातावरणामुळे दिवसा तापमान झपाट्याने वाढते, तर रात्री हवेत गारवा अनुभवता येत नाही. भारतीय हवामान विभागाने अनेक प्रदेशांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून येत्या काही दिवसांत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांचा धोका

देशभरात एकाच वेळी पसरलेल्या उष्णतेमुळे स्थिती चिंताजनक बनली आहे. अनेक शहरे एकाच वेळी जागतिक अतिउष्णतेच्या यादीत ढकलली गेली आहेत. अशा तापमानात जास्त काळ राहिल्याने उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढू शकतो. विशेषतः वृद्ध, मुले आणि घराबाहेर काम करणारे मजूर यांसारख्या घटकांबाबत उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांपासून सावधगिरी बाळ​गावी लागेल.

किंचिंत दिलासा शक्य...

हवामान अंदाजानुसार येत्या काही दिवसांत पूर्व आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता असून त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळू शकतो. मात्र जोपर्यंत मान्सूपूर्व हवामान प्रणाली अधिक तीव्र होत नाहीत किंवा प्रत्यक्ष मान्सूनची वाटचाल आणखी पुढे सरकत नाही, तोपर्यंत तापमानात लक्षणीय आणि दीर्घकाळ टिकणारी घट होण्याची शक्यता कमीच आहे.

हेही वाचा