निकाल ९४.५१ टक्के : फोंड्यात २९ शाळांचा निकाल १०० टक्के

पत्रकार परिषदेत माहिती देताना शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये. सोबत इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : इयत्ता दहावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा मुलींची कामगिरी चांगली झाली आहे. मुलींचा निकाल ९६.५१ टक्के, तर मुलांचा निकाल ९४.३७ टक्के लागला. परीक्षेला बसलेल्या २०,६१८ विद्यार्थ्यांपैकी १९,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे सरासरी निकाल ९४.५१ टक्के लागला. मागील वर्षाच्या तुलनेत हा निकाल थोडा कमी आहे. मागील वर्षी २०२४-२५ या वर्षात ९५.३५ टक्के निकाल लागला होता.
शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी पर्वरी येथे पत्रकार परिषद घेऊन दहावीच्या निकालाची घोषणा केली. यावेळी मंडळाचे सचिव विद्यादत्त नाईक, उपसचिव (आयटी) भारत चोपडे, उपसचिव रिमा मडगावकर उपस्थित होते. शालान्त मंडळाने १३ मार्च २०२६ ते ९ एप्रिल २०२६ या काळात ३२ केंद्रांमध्ये दहावीची परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. निकाल results.gbshsegoa.net आणि digilocker app GOI येथेही उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या लॉगईनवर सविस्तर निकाल पहाता येईल. परीक्षेला बसलेल्या १०,८१३ मुलांपैकी १०,०७२ जण पास झाले. परीक्षेला बसलेल्या ९,८०५ मुलींपैकी ९,४१४ मुली पास झाल्या.
‘नीड्स इम्प्रूवमेंट’ गटात ५९४ विद्यार्थी
‘नीड्स इम्प्रूवमेंट’ गटात ५९४ विद्यार्थी आहेत. एटीकेटी ४१७, तर १९१ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला आहे. सर्वसामान्य गटातील उत्तीर्णांची टक्केवारी ९५.१७ टक्के, ओबीसी ९८.३६, एससी ९४.३८ टक्के, एसटी ९७.३८ टक्के आहे.
मागील पाच वर्षांतील निकालाची टक्केवारी
२०२१ - ९९.७२ टक्के
२०२२ - ९२.७५ टक्के
२०२३ - ९६.६४ टक्के
२०२४ - ९२.३८ टक्के
२०२५ - ९५.३५ टक्के
१७८ विद्यालयांचा निकाल १०० टक्के
राज्यात एकूण १७८ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये सरकारी विद्यालये ३४, अनुदानित विद्यालये १३७, तर विनाअनुदानित ७ विद्यालयांचा समावेश आहे. तालुकानिहाय १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या पुढील प्रमाणे : बार्देश १७, डिचोली १४, काणकोण ११, धारबांदोडा ९, केपे ११, मुरगाव १०, पेडणे २२, फोंडा २९, सासष्टी २२, सांगे ४, सत्तरी ६ आणि तिसवाडी २३.
विषयनिहाय सर्वाधिक गुण आणि निकाल (टक्के)
इंग्रजी - ९८ ९९.६४
हिंदी - ९८ ९७.८७
मराठी - ९८ ९८.३८
कोकणी - ९९ ९५.३४
उर्दू - ९९ ९९.१६
संस्कृत - ९८ १००
अरेबिक - ९८ १००
फ्रेंच - ९९ १००
पोर्तुगीज - ९९ १००
स्टर्ण्डड गणित - १०० ९९.७४
बेसीक गणित - १०० ९१.४४
विज्ञान - १०० ९४.७४
सामाजिक विज्ञान - १०० ९४.३८
इंडियन साईन लँग्वेज ७८ ८६.७९
तालुकानिहाय निकाल
बार्देश ९५.५४ टक्के, डिचोली ९६.२७ टक्के, काणकोण ९७.४९ टक्के, धारबांदोडा ९८.४७ टक्के, केपे ९४.१२ टक्के, मुरगाव ९१.७० टक्के, पेडणे ९८.३५ टक्के, सासष्टी ९४.३५ टक्के, सत्तरी ९३.८८ टक्के, तिसवाडी ९५.५४ टक्के, फोंडा ९५.७८ टक्के, सांगे ९७.२९ टक्के
६ जूनपासून पुरवणी परीक्षा
एटीकेटी वा परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ६ जूनपासून पुरवणी परीक्षा घेतली जाईल. पुरवणी परीक्षेच्या तारखेत बदल होऊ शकतो.
निकालाविषयी तक्रार वा हरकतींवर विचार करण्यासाठी प्रत्येक विद्यालयाला तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यास सांगितले आहे. त्यातील एक सदस्य महिला शिक्षक असेल. समुपदेशकाचा समावेश करण्याची मुभा आहे.
उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसह व्हेरिफिकेशनसाठी एका विषयाला ३५० रुपये शुल्क असून २ मेपर्यंत अर्ज करता येतील.
उत्तरपत्रिकेचे रिव्हॅल्युएशनसाठी एका विषयाला ७०० रुपये शुल्क असून ११ मेपर्यंत अर्ज करता येतील.