कालवे अन् नद्यांमध्ये बुडून ११ जणांनी गमावले प्राण

पणजी : राज्यात एप्रिल महिन्यात पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, आतापर्यंत ८ वेगवेगळ्या दुर्दैवी घटनांमध्ये एकूण ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील तीन घटना अशा आहेत ज्यात एकाच वेळी दोघांना जीव गमवावा लागला आहे. २ एप्रिल रोजी रेवोडा येथील शापोरा नदीच्या पात्रात मासेमारीसाठी गेलेला थॉमस फर्नांडिस (३५, रा. तरमास-तळर्ण, पेडणे) हा युवक बुडाला. तर १३ एप्रिल रोजी भिरोंडा येथील पंचायतीमागील नदीत मित्रांसह आंघोळीसाठी उतरलेला गोवा वेल्हा येथील रजत काणकोणकर (२१) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.
शापोरा आणि भिरोंडा नदीत तरुणांचा बुडून मृत्यू
१४ एप्रिल रोजी कोलवाळ येथील तिलारी कालव्यात कोसळून प्रतीश जाधव (२८) या युवकाचा मृत्यू झाला; त्याचा मृतदेह तीन माड-सडये येथे सापडला. याच दिवशी वस्तवाडा-कुडचडे येथील कुटुंबासोबत खणगिणी-बेतूल येथे ओहळात आंघोळीसाठी गेलेला शलोोक नाईक (१०) आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेली बहीण सानिका नाईक (१७) यांचाही बुडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण कुडचडे परिसरात शोककळा पसरली आहे.
बेतूल येथील ओहळात बहीण-भावाचा दुर्दैवी अंत
१६ एप्रिल रोजी शिरगावच्या जत्रेसाठी व्रतस्थ असलेला धोंड दामोदर उर्फ अभिषेक दलपत नाईक (२३, रा. काजीवाडा, विठ्ठलापूर-साखळी) याचा वाठादेव येथे डिचोली नदीत फिट येऊन पडून मृत्यू झाला. अभिषेक हा जत्रेतील धार्मिक विधीसाठी व्रतस्थ होता, मात्र काळाने त्याच्यावर घाला घातला. अशा घटनांमुळे जत्रेच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
जत्रेसाठी व्रतस्थ असलेल्या युवकाचा डिचोली नदीत मृत्यू
१८ एप्रिल रोजी गुडी-पारोडा येथे खडी क्रशर कामगाराच्या विराज वद्दार या १० महिन्यांच्या मुलाचा बादलीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच २० एप्रिल रोजी बोब्रीमोड्डी-केपे येथील साळावली मुख्य कालव्यात आंघोळीसाठी उतरलेले इग्नेशियस फर्नांडिस (२४, रा. फातोर्डा) आणि हरजीत सिंग दानू (रा. उत्तोर्डा, मूळ उत्तराखंड) या माजोर्डा येथील हॉटेल कामगारांचा मृत्यू झाला.
बादलीतील पाण्यात पडून चिमुकल्याचा तर साळावली कालव्यात दोघांचा मृत्यू
शनिवारी २५ एप्रिल रोजी भाटपाल-नीववाडा (धुपेमळ) येथील वज्रे नदीत आंघोळीसाठी गेलेल्या ऋत्विक नाईक (११) आणि ध्रुव वद्दार (७) या दोन लहान मुलांचा सकाळी ११.३० च्या सुमारास बुडून मृत्यू झाला. एप्रिल महिन्यातील हे मृत्यूचे सत्र थांबता थांबत नसल्याने प्रशासनाने जलसाठ्यांजवळ जाताना नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
भाटपाल येथील वज्रे नदीत दोन लहान मुलांचा बुडून अंत