खट्टर बंधूंचे मोबाईल सापडेनात

तपासात अडचळा : माधवचा मोबाईल पाण्यात पडल्याने पेच


just now
खट्टर बंधूंचे मोबाईल सापडेनात

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : वास्को येथील सार्वजनिक कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गौतम खट्टरला गुन्हा शाखेने अटक केली आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे म्हणजे मोबाईल असून ते अद्याप पोलिसांना सापडलेले नाही. दोन्ही मोबाईल क्रमांक गौतम खट्टर यांच्या वडिलांच्या नावे असल्याचे समोर आले आहे. गौतम खट्टरचा भाऊ माधवचा मोबाईल पाण्यात पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा पोलिसांना मिळणे कठीण झाले आहे.
गौतम खट्टर याने १८ एप्रिल रोजी वास्को येथे परशुराम जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सेंट झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. याची दखल घेऊन वास्को पोलिसांनी खट्टरविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक संतोष देसाई आणि गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक डेव्हिड कॉस्ता, काॅन्स्टेबल व्यंकटेश गवंडर आणि संगमेश बिरादर यांचे पथक सोमवार, २० रोजी गौतमच्या शोधार्थ उत्तराखंडला पाठविले होते. याच दरम्यान वरील प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार, पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी तपास सुरू केला. बुधवार, २२ रोजी गुन्हा शाखेने आयोजकांना पाचारण करून जबाब नोंद केला. आयोजकांनी जबाबात सांगितले की, गौतम खट्टरच्या उपस्थितीबाबत समन्वय आणि लॉजिस्टिक व्यवस्था करण्यासाठी त्याचा भाऊ माधवशी संपर्क केला होता. माधवने विमान तिकीट, राहण्याची व्यवस्था आणि ५१,००० रुपये या अटींवर गौतमची उपस्थिती निश्चित केली होती. माधव खट्टरनेच भाषण लिहून दिले होते. कार्यक्रमात गौतमने ते वाचून दाखवले. माधवने कार्यक्रमातील भाषण स्वतः मोबाईलवर रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याची दखल घेऊन गुन्हा शाखेने गौतमचा भाऊ माधव खट्टर (१९) याला सहसंशयित केला. त्यानंतर उत्तराखंड तपासासाठी गेलेल्या वास्को पोलिसांनी माधव खट्टर याची माहिती दिली. वास्को पोलिसांनी माधवला गोव्यात आणून गुन्हा शाखेकडे सुपुर्द केले. माधवला अटक करून वास्को येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.
गौतमच्या मोबाईलसाठी पोलीस पुन्हा जाणार उत्तराखंडला
गुन्हा शाखेने माधव खट्टरचा जबाब नोंद केला. माधवने आपला मोबाईल पाण्यात पडल्याचे सांगितले आहे. आपण आणि गौतम खट्टर वापरत असलेले दोन्ही मोबाईल वडिलांच्या नावे आहेत. गौतमचा जबाब घेतल्यानंतर त्याचा मोबाईल जप्त करण्यासाठी पुढील काही दिवसांत गुन्हा शाखेचे पथक उत्तराखंडला जाणार आहे. या प्रकरणात खट्टर बंधू यांनी वापरलेेले मोबाईल जप्त करून त्यातील माहिती बाहेर काढणे आवश्यक आहे. तपासासाठी ती माहिती महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.