पंधरा ठिकाणी पडली झाडे : अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित

वाळपई : सत्तरी तालुक्यातील नाणूस परिसराला शनिवारी रात्री चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. वादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली असून, वीजपुरवठाही खंडित झाला आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नाणूस जंक्शनपासून गोशाळा रस्त्यापर्यंतच्या सुमारे एक किलोमीटर परिसरात जवळपास पंधरा ठिकाणी झाडे कोसळली आहेत. यापैकी दोन घरांवर झाडे पडल्याने त्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
चक्रीवादळामुळे झाडे कोसळून घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान
घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी युद्धपातळीवर रस्त्यावर पडलेली झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले असून ते रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडे पडल्याने वीज खांबांचेही नुकसान झाले आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता.
वाळपई अग्निशामक दलाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू
वादळामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने अनेक वाहने अडकून पडली होती. तसेच रात्री उशिरापर्यंत वीज सेवा पूर्वपदावर न आल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली. स्थानिक रहिवाशांनीही अग्निशामक दलाला रस्ते मोकळे करण्यासाठी मदत केली. चक्रीवादळाचा वेग इतका प्रचंड होता की अवघ्या काही मिनिटांत नाणूस परिसराचे जनजीवन विस्कळीत झाले.