विवाह सोहळ्यातून २० लाखांच्या अहेराची बॅग लंपास

हरमलातील घटना : फोटो सेशनवेळी चोराने साधला डाव


45 mins ago
विवाह सोहळ्यातून २० लाखांच्या अहेराची बॅग लंपास

मधलावाडा येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलेले संशयित.
...
वार्ताहर। गोवन वार्ता
हरमल : येथील एका विवाह सोहळ्यात अहेराची बॅग अज्ञात चोराने लंपास केली. फोटो सेशनवेळी बॅग बाजूला ठेवल्यानंतर चोराने डाव साधला. या बॅगेत ८ तोळ्यांचा सुवर्णहार, अंगठी, मोबाईल, अहेराची पाकिटे मिळून अंदाजे २० लाख रुपयांचा ऐवज होता. ही बॅग नवऱ्याकडच्या बाजूची होती. मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही बंद पडल्याने चोरांचा माग काढणे कठीण झाले आहे.
हरमल येथील नाईक कुटुंबातील लग्नसोहळ्यात हा प्रकार घडला. दुपारी जेवणखाण झाले होते. स्वागत समारंभही झाला. वधु-वरांसोबत नातेवाईकांचे फोटो सेशन चालू होते. यावेळी अहेराची बॅग सांभाळणारी व्यक्ती काही वेळासाठी बॅग बाजूला ठेवून फोटोसाठी व्यासपीठावर गेली. हाच मोका साधून चोराने डाव साधला. कोणाला काही समजण्याच्या आत चोराने बॅग घेऊन पोबारा केला. अहेराची बॅग लंपास झाल्याचे समज्यानंतर धावधाव झाली. सीसीटीव्ही कॅमेरे पाहून सदर चोराला पकडण्याचा प्रयत्न झाला. एखादी फुटेज मिळाली; मात्र ती अंधुक दिसत असल्याने बॅग मिळण्याची आशा मावळली.
दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद
मांद्रे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्यांच्यापरीने चोराचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हाती काहीच लागू शकले नाही. नेपाळीसारखा दिसणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी प्राथमिक संशय व्यक्त केला आहे. ही व्यक्ती हॉलमध्ये चांगल्या पेहराव्यात आली होती. तिचा साथीदार कार्यालयाबाहेर दुचाकी घेऊन थांबला होता. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणाचा मांद्रे पोलीस तपास करत आहेत.      

हेही वाचा