ब्रिटनमधील स्थानिक निवडणुकांमध्ये गोमंतकीय उमेदवारांचा डंका!

विविध पक्षांकडून अनेक जण रिंगणात : ७ मे रोजी मतदान

Story: लुई गुदिन्हो |
25th April, 09:59 pm
ब्रिटनमधील स्थानिक निवडणुकांमध्ये गोमंतकीय उमेदवारांचा डंका!

पणजी : ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या गोमंतकीयांनी आता तेथील राजकीय क्षेत्रात जम बसवला आहे. गोमंतकीय ओळख जपण्यासोबतच त्यांनी सामाजिक कार्यात भाग घेतला. ७ मे रोजी होणाऱ्या स्थानिक निवडणुकांसाठी विविध पक्षांनी गोमंतकीय वंशाच्या डझनभर उमेदवारांना तिकीट दिले असून त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. लोकसंख्या वाढल्याने अनेक गोमंतकीय सामाजिक कार्यकर्ते म्हणून पुढे आले. समुदायाचे प्रश्न सोडवण्यासाठी साल्वादोर परेरा, पामिला रॉड्रिग्ज, ख्रिस दा क्रूझ, अँजेला जॉयस डिसोझा व सांड्रा असुसाओ या उमेदवारांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, ते कौन्सिलमध्ये गोमंतकीयांचा आवाज बनू पाहत आहेत.

हौन्सलो आणि ब्रेंटमधील प्रमुख उमेदवारांची नावे

लंडन बरो ऑफ हौन्सलोसाठी हुजूर पक्षाकडून साल्वादोर परेरा (हेस्टन सेंट्रल), विवेक गणाचारी, अलिस्टर दा सा, अँथनी मास्कारेन्हास (सर्व हौन्सलो वेस्ट), जोसेफ लोबो (हॅनवर्थ) व विल्बर डिकोस्टा (क्रॅनफोर्ड) निवडणूक लढवत आहेत. मजूर पक्षाकडून पामिला रॉड्रिग्ज हौन्सलो सेंट्रलधून रिंगणात आहेत. लंडन बरो ऑफ ब्रेंटमध्ये मजूर पक्षाकडून अँजेला जॉयस डिसोझा (वेम्बली हिल) उमेदवार आहेत. हुजूर पक्षाने वेम्बली हिलसाठी फ्लॉयड दा सा व वेम्बली सेंट्रलसाठी रायन डिसोझा यांना उमेदवारी दिली आहे. रिफॉर्म पार्टीतर्फे जोलीन डायस, सांड्रा असुसाओ व वनिता मेंडोन्सा (सर्व वेम्बली हिल) रिंगणात आहेत.

स्विंडन बरो कौन्सिलमध्ये मजूर पक्षाचे उमेदवार

इम्तियाज शेख (क्वीन्स पार्क), अ‍ॅडोराबेले अमरल शेख, डोमिंगोस डायस (दोन्ही ब्रॉडग्रीन), आना फर्नांडिस (रॉड्सबर्न फर्नडेल-वेस्टर्न वॉर्ड), प्रिन्सिया फर्नांडिस (गोर्स हिल). पॅरिश कौन्सिलर म्हणून डॅनियल व्हॅलेस, जोसेलिना डिसोझा, लूर्ड्स डी ऑलिव्हेरा, अँथनी टोनी फर्नांडिस (रॉड्सबर्न फर्नडेल) व म्युराल कार्डोझो (ब्रॉडग्रीन) रिंगणात आहेत. या उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचारावर भर दिला आहे.

स्विंडनमध्ये हुजूर पक्षाचे उमेदवार आणि इतर मतदारसंघ

नताशा वास (रॉड्सबर्न, फर्नडेल-वेस्टर्न वॉर्ड), अॅनाबेले पेगाडो, सावियो टेलेस, अल्बानो लॉरेन्को (सर्व ब्रॉडग्रीन), इनासिओ व्हिक्टोरिया दा सिल्वा, लिव्हियो जो कॅमेलो (दोन्ही क्वीन्स पार्क) व रोशेल व्ही कार्दोझ. याशिवाय हुजूर पक्षाने लंडन बरो ऑफ सटनमधील कारशॅलटन साऊथ-क्लॉकहाऊस वॉर्डातून ख्रिस दा क्रूझ, तर लंडन बरो ऑफ हॅरोमधील रॉक्सबर्न वॉर्डातून मार्क बॅरेटो यांना उमेदवारी देऊन गोमंतकीय वंशाच्या लोकांना प्रतिनिधित्व दिले आहे.

गोमंतकीय उमेदवारांची निवडणूक लढवण्यामागची भूमिका

गोमंतकीय समाजाचे दुर्लक्षित प्रश्न सोडवण्यासाठी आणि स्थानिक समुदायाला मदत करण्यासाठी कौन्सिलमध्ये आपला प्रतिनिधी असणे गरजेचे आहे, असे साल्वादोर परेरा यांनी सांगितले. ब्रेंट कौन्सिलमधील गोमंतकीय समुदायाच्या आणि इतर स्थानिक रहिवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी मला त्यांना मदत करायची आहे, असे जॉयस डिसोझा यांनी सांगितले. या निवडणुकांच्या निकालाकडे आता संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले आहे.

#UKLocalElections #GoansInUK #GoaNews #Panaji #GoanCandidates #Hounslow #Brent #Swindon #MarathiNews