केक तोंडाला फासल्याने केली​ तिघांची गोळ्या झाडून हत्या

मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
केक तोंडाला फासल्याने केली​ तिघांची गोळ्या झाडून हत्या

बुलंदशहर : एका वाढदिवसाच्या पार्टीत केक तोंडाला लावण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तिहेरी हत्याकांडात झाल्याची खळबळजनक घटना बुलंदशहरमधील खुर्जा भागात घडली आहे. या गोळीबारात भाजप नगरसेवकाचे दोन भाऊ आणि एका १७ वर्षीय पुतण्याचा मृत्यू झाला असून, संपूर्ण उत्तर प्रदेश या घटनेने हादरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खुर्जा परिसरात एका बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टीत आनंद साजरा होत असताना एकमेकांना केक लावण्यावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने रागाच्या भरात पिस्तूल काढून गोळीबार केला. आरोपीने झाडलेल्या गोळ्या थेट तिघांना लागल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या हल्ल्यात मृत्यू झालेले तिघेही एकाच कुटुंबातील असून ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. मनीष आणि अमरदीप हे नगरपालिकेचे नगरसेवक संजय सैनी यांचे सख्खे भाऊ आहेत. आकाश (१७ वर्षे) हा त्यांचा पुतण्या असून तो अल्पवयीन होता.
गोळीबार करणारा मुख्य आरोपी जीतू हा समाजवादी पक्षाचा माजी शहराध्यक्ष असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतक भाजपचे कार्यकर्ते आणि आरोपी सपाचा पदाधिकारी असल्याने या हत्येमागे जुने राजकीय वैमनस्य होते का, याचाही पोलीस तपास करत आहेत. मात्र, प्रत्यक्षदर्शींच्या मते केवळ केक लावण्यावरून झालेल्या वादातूनच ही घटना घडली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस महासंचालकांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
आरोपी फरार
गोळीबार केल्यानंतर आरोपी जीतू घटनास्थळावरून फरार झाला आहे. डिआयजी कलानिधी नैथानी यांनी सांगितले की, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची अनेक पथके रवाना करण्यात आली आहेत. राजकीय नेत्यांशी संबंधित प्रकरण असल्याने परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस सर्व कोनातून तपास करत आहेत.बुलंदशहरमधील या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, क्षुल्लक कारणावरून थेट हत्या करण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा