व्हाईट हाऊस पत्रकारांच्या स्नेहभोजनात मोठा थरार; हल्लेखोराला सुरक्षा रक्षकांनी केले जेरबंद

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या एका कार्यक्रमात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली. वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये आयोजित 'व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स असोसिएशन'च्या स्नेहभोजन कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. गोळीबाराचा आवाज येताच सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली करत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स यांना सुरक्षित स्थळी हलवले. सुदैवाने, या घटनेत राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी सुरक्षित आहेत.
हॉटेलच्या लॉबीमध्ये गोळीबाराचा आवाज आला आणि संपूर्ण सभागृहात खळबळ उडाली. या घटनेनंतर व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी परिस्थितीची माहिती दिली. ते म्हणाले की, हा कार्यक्रम अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी समर्पित होता आणि दोन्ही पक्षांचे सदस्य तसेच प्रसारमाध्यमांना एकत्र आणून एकीचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. मात्र, याच दरम्यान एका सशस्त्र हल्लेखोराने गोळीबार केला. सीक्रेट सर्व्हिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी अत्यंत धाडसाने आणि तत्परतेने हल्लेखोराला जागेवरच रोखले.
या चकमकीत सुरक्षा दलाचा एक अधिकारी जवळून गोळी लागल्याने जखमी झाला आहे. मात्र, बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्या अधिकाऱ्याचा जीव वाचला असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. या तणावपूर्ण घटनेनंतरही ट्रम्प यांनी सुरक्षा यंत्रणांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे सार्वजनिक कार्यक्रमांना खीळ बसता कामा नये, असे स्पष्ट करत हा कार्यक्रम आगामी ३० दिवसांच्या आत पुन्हा आयोजित केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत हल्लेखोराला अटक करण्यात आल्याची पुष्टी केली आहे. राष्ट्राध्यक्षांसह त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य सुरक्षित असून कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. ज्या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते, त्याच्या अगदी बाहेरील भागात हा गोळीबार झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याचा निषेध केला जात आहे.
ब्लॅक एप्रिलचा होता का प्लान ?
ट्रम्प यांनीअब्राहम लिंकन यांच्याशी स्वतःची तुलना करत राजकीय हत्यांच्या इतिहासाचा संदर्भ दिला. बटलर आणि पाम बीचनंतरची ही तिसरी घटना असून, सर्वाधिक प्रभावी नेतेच निशाण्यावर असल्याचे त्यांनी म्हटले. एप्रिल महिन्यातच हत्या झालेल्या लिंकन यांच्याप्रमाणेच आपणही धोक्यात असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. हल्लेखोरांचा ब्लॅक एप्रिलचा प्लान असल्याचे ते म्हणाले.