‘लेडी गॅंग’चा सिद्धेश्वर एक्सप्रेसवरील दरोड्याचा कट उधळला; ९ महिलांना आरपीएफकडून अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
‘लेडी गॅंग’चा सिद्धेश्वर एक्सप्रेसवरील दरोड्याचा कट उधळला; ९ महिलांना आरपीएफकडून अटक

सोलापूर : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सतर्क असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) मोठी कारवाई करत ‘लेडी गॅंग’चा (Lady gang)  सिद्धेश्वर एक्सप्रेसवरील दरोड्याचा कट उधळून लावला आहे. या प्रकरणी ९ महिलांना अटक करण्यात आली आहे. त्या दरोडेखोरांच्या टोळीशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे.

संशयास्पद हालचालींमुळे कारवाई

कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर बुधवारी रात्री आरपीएफच्या ( RPF)  गुन्हे प्रतिबंधक पथकाने तीन महिलांना संशयास्पद वर्तन करताना पाहिले. चौकशी केल्यानंतर त्यांना स्थानकाबाहेर जाण्यास सांगण्यात आले.  मात्र त्या लातूर एक्सप्रेसमध्ये (Latur Express)  चढल्या. यानंतर आरपीएफने तत्काळ इतर स्थानकांना सतर्कतेचा इशारा दिला.

सततच्या देखरेखीमुळे टोळीचा पर्दाफाश

संशयित महिलांनी जेजुरी स्थानकावर उतरून मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये (Mumbai-Latur Sidheshwar Express)  प्रवेश केला. आरपीएफच्या पथकांनी त्यांच्यावर बारकाईने नजर ठेवत सोलापूर स्थानकावर त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत या महिला सोलापूर व पुणे रेल्वे विभाग परिसरात कार्यरत असलेल्या दरोडेखोर टोळीचा भाग असल्याचे स्पष्ट झाले.

धाराशिव जिल्ह्यातील महिलांचा समावेश

अटक करण्यात आलेल्या महिलांचे वय १८ ते ४० वर्षांदरम्यान असून; त्या धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांना पुढील चौकशीसाठी कुर्डुवाडी येथील सरकारी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कायदेशीर कारवाई सुरू

या महिलांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(४) अंतर्गत (दरोड्याची तयारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या टोळीच्या आधीच्या कारवायांचाही शोध घेतला जात आहे.

हेही वाचा