सात खासदारांचा प्रवेश; एनडीए राज्यसभेत दोन तृतीयांश बहुमताच्या जवळ

भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ पोहोचले ११३वर; राजकीय समीकरणे बदलली

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
सात खासदारांचा प्रवेश; एनडीए राज्यसभेत दोन तृतीयांश बहुमताच्या जवळ

नवी दिल्ली : आम आदमी पक्षातील १० पैकी ७ खासदार भारतीय जनता पार्टीत दाखल झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. या राजकीय घडामोडीत भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ ११३ वर पोहोचले आहे. एनडीए आता दोन तृतीयांश बहुमताच्या जवळ आली आहे. पक्षात फूट पडल्यानंतर 'आप'चा संसदेतील प्रभाव घटला आहे. विरोधी पक्षांच्या एकजुटीला मोठा तडा गेला आहे.

राज्यसभेतील समीकरणात बदल 

आम आदमी पार्टीच्या (Aap) ७ खासदारांच्या गटाचे भाजपमधील (BJP) विलीनीकरण राज्यसभेचे सभापती अधिकृतपणे मान्य करतील, तेव्हा भाजप खासदारांची संख्या १०६ वरून ११३ होणार आहे. भाजप आपल्या स्वबळावरील बहुमताच्या जादुई आकड्यापासून (१२३) केवळ १० जागा दूर असणार आहे. राज्यसभेचे एकूण संख्याबळ २४४ आहे.

एनडीए मजबूत स्थितीत 

भाजपप्रणीत एनडीएचे (NDA) आधीच बहुमत आहे. सात खासदारांच्या प्रवेशानंतर त्यात आणखी भर पडली आहे. एनडीएतील सहयोगी पक्षांचे २८ खासदार आणि 'आप'चे नवे ७ खासदार मिळून एकूण संख्याबळ १४९ च्या वर जाणार आहे.

त्यात ७ नियुक्त आणि २ अपक्ष खासदारांचा पाठिंबा समाविष्ट आहे. राज्यसभेत (Rajya Sabha) दोन तृतीयांश बहुमतासाठी १६३ जागांची आवश्यकता असते. आता एनडीएला हा आकडा गाठण्यासाठी १३ खासदारांची गरज आहे. 

हेही वाचा