पीडितेची महिला आयोगासमोर जबानी

नाशिक : आयटी कंपनी टीसीएसच्या (IT Company TCS) नाशिक येथील नाशिक बीपीओ युनिटमधील (Nashik BPO Unit) लैंगिक छळ (Sexual harrasment) आणि धार्मिक दबावाच्या प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. एका पीडित महिलेने कार्यालयातील अंतर्गत सिस्टीमचे पासवर्ड ‘अश्लील भाषेत’ ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे कार्यस्थळावरील वातावरण किती विषारी होते याची झलक मिळत असल्याचे सांगितले आहे.
महिलेने महिला आयोगासमोर दिलेल्या जबाबात सांगितले की, प्रशिक्षणासाठी नोकरीत रुजू झाल्यापासूनच तिला मानसिक छळ, अश्लील संभाषणे आणि अयोग्य वर्तनाला सामोरे जावे लागले. आरोपींपैकी एक, रझा रफीक मेमन, कामाच्या निमित्ताने वारंवार केबिनमध्ये बोलावून मर्यादा ओलांडणाऱ्या टिप्पणी करत असे, असा आरोपही तिने केला आहे. याशिवाय तिच्या धार्मिक भावनांनाही धक्का पोहोचवणाऱ्या वक्तव्यांचा उल्लेख तिने केला.
सर्वात गंभीर आरोपांपैकी एक म्हणजे कार्यालयातील अधिकृत पासवर्डच ‘अश्लील शब्दांमध्ये’ ठेवले जात होते. तपास यंत्रणा या दाव्याची चौकशी करत असून, हा प्रकार दीर्घकाळ चालत आलेल्या गैरवर्तनाच्या पॅटर्नकडे निर्देश करतो का, याचा शोध घेतला जात आहे.
पीडितेच्या मते, तिने सुरूवातीला आपल्या वरिष्ठांकडे तक्रार केली होती; मात्र ती दुर्लक्षित करण्यात आली. उलट परिस्थिती आणखी बिघडली. त्यानंतर दोन कर्मचाऱ्यांनी तिचा डिजिटल पाठलाग (स्टॉकिंग) केल्याचा आणि कार्यालयात अफवा पसरवल्याचा आरोपही तिने केला आहे, ज्यामुळे कार्यस्थळ तिच्यासाठी शत्रुत्वपूर्ण बनले.
हे प्रकरण याआधीही चर्चेत आले होते, जेव्हा दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने दानिश शेख याच्यावर लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आणि तो आधीपासून विवाहित असल्याचे लपवल्याचा आरोप केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, २०२२ ते २०२६ दरम्यान नाशिक कार्यालयात अनेक महिलांनी अशाच प्रकारच्या मानसिक व लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या आहेत.
एका कंत्राटी कर्मचाऱ्यानेही तपासादरम्यान सांगितले की, “हिंदू मुलींशी संबंध ठेवून लग्न करा, धर्मांतर करा,” अशा प्रकारच्या वक्तव्यांची कार्यालयात चर्चा होत असे. आणखी एका माजी कर्मचाऱ्याने सांगितले की, “संवादाची पद्धत अत्यंत अश्लील होती. मुलींना टीम लीडरच्या डेस्कवर बोलावून अवमानकारक भाषा वापरली जात असे.”
सात जणांना अटक
दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत सहा पुरुष आणि एका महिला एचआर कर्मचाऱ्यासह एकूण सात जणांना अटक केली आहे. छेडछाड, स्टॉकिंग, कार्यस्थळी धमकावणे आणि धार्मिक दबाव टाकण्याचे प्रयत्न अशा नऊ वेगवेगळ्या तक्रारींची चौकशी सुरू आहे. काही आरोपींना निलंबितही करण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रातील कार्यस्थळ सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणा प्रभावीपणे काम करत आहेत का, तसेच आधीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाले का, यावरही आता व्यापक चर्चा सुरू झाली आहे.