वास्कोतील अंडर पास खुला; आपत्कालीन वाहनांना मार्ग मोकळा!

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
वास्कोतील अंडर पास खुला; आपत्कालीन वाहनांना मार्ग मोकळा!

वास्को (Vasco) : शहरातील नागरिकांसाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेला रेल्वे अंडर पास (Railway underpass)  अखेर अनौपचारिकरित्या सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे जड वाहतूक आणि आपत्कालीन वाहनांना (Emergency vehicles)   मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक समस्येत मोठी सुधारणा होणार असल्याचे मानले जात आहे.

स्थानिक आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले की, भूमीगत केबलिंग व सांडपाणी प्रकल्पासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांवर आता सर्वत्र ’हॉट मिक्सिंग’चे काम सुरू करण्यात आले आहे. ही कामे पूर्ण झाल्यावर रस्त्यांची स्थिती लवकरच पूर्ववत होईल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुसह्य होईल. 

दरम्यान, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी नमूद केले की, यापूर्वी रेल्वे पुलाच्या उंचीच्या मर्यादेमुळे मेस्तावाडा आणि आसपासच्या भागात आपत्कालीन सेवा पोहोचण्यात अडचणी येत होत्या. मात्र, नवीन अंडर पास सुरू झाल्यामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांसारख्या सेवांना आता कोणताही अडथळा राहणार नाही.

या भुयारी मार्गामुळे वास्कोवासियांना मोठा दिलासा मिळणार असून, आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद मिळण्यास मदत होणार आहे. 

हेही वाचा