गोमंतकीयांच्या प्रेमामुळेच जनसेवा करू शकलो!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : साखळी येथे वाढदिवस मोठ्या उत्साहात

Story: वार्ताहर । गोवन वार्ता |
24th April, 11:16 pm
गोमंतकीयांच्या प्रेमामुळेच जनसेवा करू शकलो!

साखळी : जनसेवा हा माझा आवडता विषय असून साखळी मतदारसंघाचा आमदार आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सेवा करणे मला मनापासून आवडते. साखळीवासीय आणि समस्त गोमंतकीयांच्या प्रेमामुळेच ‘स्वयंपूर्ण गोवा’ आणि ‘ते माझे घर’ यांसारख्या लोककल्याणकारी योजना मी अमलात आणू शकलो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. साखळी येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात ते बोलत होते.
आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि माजी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सदैव दिलेला पाठिंबा आणि सहकार्यामुळेच राज्याच्या विकासाची गती कायम राखता आली. या पाठबळामुळेच मला तळागाळातील जनतेची सेवा करण्याची शक्ती मिळाली.
साखळी रवींद्र भवनच्या आवारात उभारलेल्या भव्य व्यासपीठावर हा सोहळा पार पडला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री नीळकंठ हळर्णकर, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार गोविंद गावडे, उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार उल्हास तुयेकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार नीलेश काब्राल, आमदार दाजी साळकर, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, भाजप महिला प्रभारी सुलक्षणा सावंत, मुख्यमंत्र्यांचे वडील पांडुरंग सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. साखळी आणि राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
‘चेक्ड बाय डॉक्टर २.०’ चा शुभारंभ
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या उपस्थितीत गोवा कॉलेज ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स येथे ‘हेल्थ विथ आयुर्वेद चेक्ड बाय डॉक्टर २.०’ मल्टिस्पेशालिटी आयुर्वेद आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

पंतप्रधानांसह देशभरातील मान्यवरांकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा शुक्रवारी वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त त्यांच्यावर राज्यभरातून तसेच देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा विविध स्तरांतून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉ. सावंत यांना शुभेच्छा ​दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ते म्हणाले, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! विविध क्षेत्रांत गोव्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते अग्रस्थानी राहून कार्य करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतीच्या नव्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच सदिच्छा!
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ट्विट करून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. प्रमोद सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सातत्यपूर्ण लोकसेवेसाठी मी प्रार्थना करतो, असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले. तसेच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही मुख्यमंत्र्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
विविध मुख्यमंत्र्यांकडून सदिच्छा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले की, डॉ. प्रमोद सावंत यांना मनःपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सक्षम नेतृत्वाखाली गोवा राज्य प्रगतीच्या मार्गावर सतत वाटचाल करत राहो, हीच प्रार्थना. याशिवाय आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राष्ट्रीय नेत्यांनी डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गोव्यातील स्थानिक नेत्यांनी आणि जनतेनेही सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या सदिच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा